Sat, Nov 17, 2018 20:54होमपेज › Kolhapur › बोगस प्रमाणपत्र; चौकशी अंतिम टप्प्यात

बोगस प्रमाणपत्र; चौकशी अंतिम टप्प्यात

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सीपीआर प्रशासनाने राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडील अपंग कर्मचार्‍यांच्या प्रमाणपत्रांची समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत या प्रकरणातील सत्यता बाहेर येईल, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. ‘सीपीआरचे कर्मचारी अपंग’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’मध्ये 23 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. 

सीपीआर प्रशासनाने बोगस प्रमाणपत्रे  देणार्‍यांचा व घेणार्‍यांचा गतीने शोध सुरू केला आहे. चौकशी समितीद्वारे प्रशासनाने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली आहे.  पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. बनवेगिरी करून प्रमाणपत्रे देण्यात येथील काही ‘बड्या’ डॉक्टरांचा हात आहे. अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे मिळून शासनाला गंडा घातला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सीपीआरमध्ये अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांची जोरदार चर्चा सुरू आहे. 

आरोग्य सेवा संचालनालयाने अपंग प्रमाणपत्रांची तपासणी करून नवीन प्रणालीनुसार नूतनीकरण करण्याचा अध्यादेश काढला आहे. एसएडीएम  प्रणालीद्वारे प्रक्रिया सुरू आहे; पण अनेक ‘शंकास्पद’ अपंग बांधवांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.आरोग्याने सदृढ; पण कागदोपत्री अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्रांचा लाभ मिळविलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहे. चौकशी समितीचा अहवाल येताच प्रशासन दोषींवर कारवाई करणार आहे.

अहवाल पाहून कारवाई

अपंग प्रमाणपत्रांची गतीने चौकशी सुरू असून येत्या दोन दिवसांत या प्रकारणाचा पर्दाफाश करू.कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर चौकशी अहवाल पाहून कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया अधिष्ठता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.