Wed, Jun 26, 2019 18:17होमपेज › Kolhapur › रंकाळा तलावात पुन्हा ‘ब्ल्यू ग्रीन अ‍ॅलगी’

रंकाळा तलावात पुन्हा ‘ब्ल्यू ग्रीन अ‍ॅलगी’

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहराचे सौंदर्य खुलवणारा निळाशार रंकाळा पुन्हा एकदा हिरवा होऊ लागला आहे. रंकाळ्याच्या पाण्याचा रंग काहीसा हिरवा दिसत आहे, यामुळे ‘ब्ल्यू ग्रीन अ‍ॅलगी’चे सावट आहे. याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

थेट मिसळणार्‍या सांडपाण्याने रंकाळा प्रदूषितच नव्हे, तर विषारी बनला होता. ऑगस्ट 2013 मध्ये रंकाळ्याच्या पाण्यात ‘ब्ल्यू ग्रीन अ‍ॅलगी’ या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. यामुळे रंकाळा हिरवागार झाला होता. हिरवागर्द रंग असावा, असा दाट तवंग रंकाळ्यावर पसरला होता. थेट आणि मोठ्या प्रमाणात मिसळणार्‍या सांडपाण्याने रंकाळ्याची ही दुर्दैवी अवस्था झाली होती. 

रंकाळ्याची तशी दुर्दशा पुन्हा होण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांपासून रंकाळ्याच्या पाण्याचा रंग हिरवा होऊ लागला आहे. त्याचे प्रमाण सध्या जास्त नसले, तरी सहज डोळ्याला हा रंग जाणवत आहे. एरव्ही निळाशार दिसणारा रंकाळा हिरवा दिसू लागल्याने पर्यावरणप्रेमींसह नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ‘ब्ल्यू ग्रीन अ‍ॅलगी’चा पुन्हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे, त्याला चांगले यशही मिळत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर रंकाळ्यात पुन्हा ‘ब्ल्यू ग्रीन अ‍ॅलगी’चा प्रादुर्भाव झाला आणि तो वाढला, तर रंकाळ्याचे प्रदूषण रोखणे भविष्यात कठीण होईल, असे जाणकारांचे मत आहे. यामुळे रंकाळा प्रदूषित तर होईलच; पण त्याबरोबरच तो अधिक विषारी होईल, अशीही भीती व्यक्‍त केली जात आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर रंकाळ्याच्या परिस्थितीचा तातडीने अभ्यास करावा, त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात आणि रंकाळ्याचे अस्तित्व कायम ठेवण्याची गरज आहे. प्रारंभी दुर्लक्ष करायचे आणि नंतर अंगाशी आले की कसरत करायची, अशी जुनीच सवय महापालिकेची आहे. रंकाळ्याच्या जलपर्णी निर्मूलनातून अनेकवेळा ते स्पष्टही झाले आहे. यामुळे रंकाळ्याबाबत महापालिकेने गांभीर्याने आणि वेळेत उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.