Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Kolhapur › ब्लॉग: मूषक पुराण- बन्या बापू

ब्लॉग: मूषक पुराण- बन्या बापू

Published On: Mar 24 2018 12:18PM | Last Updated: Mar 24 2018 12:17PMबन्या बापू

बने, बने, अशी वेंधळ्यासारखी काय पाहतेस? आपण विधानभवन प्रांगणात आहोत. येणार्‍या-जाणार्‍याकडे एवढी टक लावून काय पाहतेस? काय म्हणतेस, आपले नाथाभाऊ म्हणजे एकनाथ खडसे यांना शोधतेय, म्हणतेस! मग असे सांग ना! ते पाहा नाथाभाऊ, तेच हाफशर्ट घातलेले. ते कुणाला तरी करड्या आणि बुलंद आवाजात सुनावतायत  बघ. नाथाभाऊ विधानसभेत बोलायला उठले, एक पाय त्यांनी बाकावर मुडपला आणि खिशात हात घालून सरबत्ती सुरू केली, की एक तास गडी काही थांबणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा नाथाभाऊ विरोधी नेत्याच्या भूमिकेत! नाथाभाऊंची तोफ दणाणली, की सरकारचा थरकाप उडत असे. काय म्हणतेस, नाथाभाऊंनी अद्याप आपली भूमिका बदललेली नाही, म्हणतेस? म्हणजे सत्ताधारी पक्षात असूनही ते विरोधकासारखे सरकारवर हल्‍लाबोल करतात, असे म्हणायचे तुला. बने, बरोबर आहे तुझे! नाथाभाऊंच्यावर आरोप झाला आणि त्यांचे मंत्रिपद गेले. नाथाभाऊ भाजपचे ज्येष्ठ नेते. पक्ष वाढीसाठी त्यांनी हाडाची काडे केली आणि सत्ता हाती येताच, लगेच त्यांना वनवासी व्हावे लागले, हे नाथाभाऊंचे शल्य आहे. आपल्यापेक्षा इतरांवर अधिक गंभीर आरोप आहेत. पण, त्यांना ‘क्‍लीन चिट’ मिळते आणि आपल्यावर मात्र टांगती तलवार आहे, यामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. आपले पुनर्वसन होईल, पुन्हा मंत्रिपद मिळेल, म्हणून त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. तथापि, त्यांची अपेक्षापूर्ती काही होताना दिसत नाही. त्यामुळे नाथाभाऊ संतप्‍त आहेत आणि सरकारवर हल्‍ला करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

गेल्याच आठवड्यात नाथाभाऊंनी सरकारी आरोग्य सेवेचे वाभाडे काढले. आपल्या गावातील हॉस्पिटलची सेवा ही ‘भीक नको, कुत्रे आवर,’ अशा धर्तीची असल्याचा त्यांचा रोख. हॉस्पिटल समारंभपूर्वक बंद करावे, असा नाथाभाऊंचा प्रस्ताव. त्यासाठी त्यांनी आरोग्यमंत्र्यांनाच निमंत्रण दिले आणि त्यांच्या शुभहस्ते हॉस्पिटलला टाळे लावण्याचा जाहीर कार्यक्रमच करू, म्हणून सुनावले! बने, एकनाथ खडसे किती रागावले आहेत, हे कळले ना?

बने, गेल्या आठवड्यात नाथाभाऊंनी असे शरसंधान केले आणि आता तर त्यांनी विधानसभेत बॉम्बस्फोटच केला! मंत्रालयातील मूषक पुराणच त्यांनी घडाघडा वाचून दाखवले आणि सारे सभागृह थक्‍क झाले. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार! या उंदरांनी फायली कुरतडण्याची, काही तर फस्त केल्याची चित्तचक्षुचमत्कारिक सुरस कथा यापूर्वी गाजली होती. आताचे पुराण आहे, ते मूषक संहाराचे! याविषयीचा मनोरंजक अहवालच नाथाभाऊंनी सादर केला. उंदरांना मारण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. या कंपनीनेच आपल्या कामगिरीचा लेखा-जोखा दिलाय. या कंपनीने अवघ्या 7 दिवसांत मंत्रालयातील 3 लाख 19 हजार 400 उंदरांचा नायनाट केला. म्हणजे दररोज सरासरी 45 हजार उंदीर मारले. दररोज 9 टन एवढ्या म्हणजे एक ट्रकभर उंदरांची विल्हेवाट लावली. बने, या कंपनीकडे एखादा जादूचा दिवा असेल काय? नाथाभाऊंच्या मते, मुंबई महापालिकेला दोन वर्षांत 6 लाख उंदीर मारता आले. 104 आठवड्यांत 6 लाख उंदीर. म्हणजे,  52 आठवड्यांत 3 लाख उंदीर असा हिशेब झाला. मुंबई पालिकेला 3 लाख उंदीर मारायला 52 आठवडे लागले, तर या कंपनीने मात्र आठवड्यातच ही कामगिरी फत्ते केली. काय म्हणतेस बने? या कंपनीला पुरस्कार द्यायला हवा? हो, देतीलही कदाचित. आता नाथाभाऊंनी हे मूषक पुराण चव्हाट्यावर आणले आणि दहा मांजरांनीही अशी कामगिरी बजावली असती, अशा शालजोडीतून आहेर दिला. आतापर्यंत बने, आपण सरकारी निधीला लागलेल्या घुशी आणि उंदरांचे किस्से ऐकत होतो. आता उंदरांच्याच नावाने काय चाललेय ते बघ! नाथाभाऊ नेहमी म्हणतात की, मी तोंड उघडले, की भूकंप होईल. बने, हा त्याचा ट्रेलर नसेल ना?

Tags : pudhari, editorial,  eknath khadse