Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Kolhapur › मराठी भाषेची समृद्धी

मराठी भाषेची समृद्धी

Published On: Feb 27 2018 7:28AM | Last Updated: Feb 27 2018 7:28AMकोल्हापूर : डॉ. यशवंत पाठक 

आजवर मराठीमध्ये अलौकिक अशी कामगिरी झाली आहे. मराठीपण हे काळाच्या ओघात आपण विसरता कामा नये. मराठी समृद्ध झाली, तर अनेक प्रश्‍न सुटू शकतील. आपल्या देशावर 400 वर्षे मुस्लिमांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांची सत्ता 150 वर्षे होती; या काळात मराठीमध्ये बदल झाले; पण ती नष्ट झाली नाही. मराठी भाषा ही इतकी समृद्ध आहे की, ती कधीही नष्ट होणार नाही.

प्राचीन काळी मराठी ही धर्मभाषा होती; पण पुरेशा प्रमाणात ती ज्ञानभाषा नव्हती. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात मराठीकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालं. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी ती राजभाषा करण्यात आली. हा सर्वांगीण विकास करताना शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांचं माध्यम मराठी असलं पाहिजे. राज्य शासनाच्या सर्व संस्थांमधून मराठीतच व्यवहार झाले पाहिजेत. मंत्रालय, न्यायपालिका अशा सर्वच स्तरांवर मराठीतूनच व्यवहार झाले पाहिजेत. आज हे व्यवहार मराठी माध्यमातून होत आहेत; पण त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही. आज इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा मानली जाते. ही भाषा आपल्याला यायला हवी याच शंका नाही; पण त्याचबरोबर मातृभाषेचा आणि तिच्या संस्कारांचाही आपल्याला अभिमान असला पाहिजे. भाषेच्या समृद्धीतूनच समाजाचा विकास होऊ शकतो. 

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आजन्म मराठीसाठी झगडले. ते नेहमी म्हणायचे, भाषेची समृद्धी भाषा शिकण्यातून येते; पण आसपासच्या भाषांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यातून जास्त येत असते. त्यांनी इंग्रजीचे अनुवाद केले, अनेक संस्कृत पंडितांकडून मेघदूतसाठी चर्चा केली. हे जे घेणं आहे, त्यातून भाषा समृद्ध होते. आजही भाषेचा मोठा सुंदर वसा सांगायचा असेल, तर मी वारीकडेच बोट दाखवेन. तो लाखोंचा प्रवाह जातो तीच मराठी. त्यामुळे मराठीचे वैभव मुळातच गोड आहे, श्रीमंत आहे, शब्दांना अतिशय समृद्धता आहे. य. दि. फडके म्हणायचे, ‘मराठीत प्रत्येक शब्दाला उत्कृष्ट शब्द आहेत, ते वापरा.’ तर्कतीर्थ मराठीच्या पहिल्या विश्‍वकोशाच्या प्रकाशन संमारंभाला म्हणाले होते, ‘फक्‍त मराठीमध्ये एकही इंग्रजी शब्द न वापरता आज आपल्याला व्याख्याने द्यायची आहेत. त्यासाठी विश्‍वकोश काढलेला आहे.’ जगाच्या उंबरठ्यावर उभे राहताना मी विश्‍व कसे पाहायचे, त्याचा बोध कसा घ्यायचा आणि विश्‍वात राहात असताना मला माझ्या मातृभाषेची कक्षा विस्तृत कशी करायची हे बघितले पाहिजे. इंग्रजी भाषेने बाकीच्या सर्व गोष्टी भराभर शोषून घेतल्या. म्हणून भाषा ही नेहमी लवचिक असावी लागते, ताठर नको. भाषेने इंद्रधनुष्यासारखी वळणे घ्यावी लागतात. ती वळणे राहिली तर भाषिक आवाका, भाषिक कक्षा अधिक विस्तृत होतील. मराठीचे वैभव मराठीच्या अधिकाधिक व्यापक व्यवहारातून आणि त्या जाणिवेत आहे. मराठी माणसाने मी सर्व ठिकाणी माझ्या भाषेतून व्यक्‍त होईन, असे ठरवले पाहिजे. ही भावना निर्माण होईल तेव्हा त्या माणसाच्या वैभवशाली परंपरेतच मराठी आणखी वैभवित होईल.  

आज आपल्याकडे मराठी भाषेत किती तरी समृद्ध असं ग्रंथभांडार आहे. त्यामध्ये सुभाषितं, ओव्या, अभंग असं किती तरी ग्रंथभांडार आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा विचार आपण केला पाहिजे. मराठीचं ऋण आपल्यावर इतकं आहे की, ते शब्दांत व्यक्‍त करण्यात येण्यासारखं नाही. ज्ञानेश्‍वरांनी ओव्या लिहिल्या, तर तुकारामांनी अभंग लिहिले. हे मराठी भाषेवरचं ऋणच आहे. मराठी समृद्ध झाली, तर अनेक प्रश्‍न सुटू शकतील; पण याचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. प्रसिद्ध कवी सुरेश भट यांनी मराठी भाषेची दैना कशी झाली आहे, याचं वर्णन आपल्या एका कवितेत केलं आहे.  ‘पाहुणे घरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी ’ हे असे कितीक खेळ पाहते मराठी, जेवढी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी’ अशा शब्दांत त्यांनी मराठीची दैना व्यक्‍त केली आहे. आज मराठी भाषेचं ऋण न विसरता तिचा वापर करायला आपण शिकलं पाहिजे.  मराठीच्या म्हणींचे वैभव खूप आहे. थोड्या शब्दांत मोठा आशय त्यातून व्यक्‍त होतो. भाषिक व्यक्‍त होण्याची जी काही मूल्यात्मक ताकद असते, ते भाषेचे वैभव असते. 

आज अनेक विचारवंत मराठीच्या या भविष्यकालीन परिस्थितीबद्दल व्याकूळ होत आहेत; पण माझ्या मते अशी भीती बाळगण्याचं आणि त्यामुळे व्याकूळ होण्याचं कारण नाही. मराठी भाषा ही इतकी समृद्ध आहे की ती कधीही नष्ट होणार नाही. आपल्या देशावर 400 वर्षे मुस्लिमांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांची सत्ता 150 वर्षे होती. मराठी ही राजभाषा झाल्यानंतर तिला राजाश्रय मिळाला. शासनाच्या दरबारात ती प्रभावी ठरली. राजदरबारात प्रत्येक शब्द मराठीतच बोलला पाहिजे, असा नियम करण्यात आला. या सर्व काळात मराठीमध्ये बदल झाले; पण ती नष्ट झाली नाही. यामुळे मराठी भाषेविषयी चिंता करण्याचं कारण नाही.