Wed, Jul 08, 2020 18:37होमपेज › Kolhapur › स्फोटकप्रकरणी धागेदोरे हाती : दोघे ताब्यात

स्फोटकप्रकरणी धागेदोरे हाती : दोघे ताब्यात

Last Updated: Oct 21 2019 1:47AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. महामार्गावर पोलिसांच्या नाकाबंदीच्या धास्तीने शिकार्‍यांनी 15 लसणी बॉम्ब असलेला जर्मनी डबा व स्फोटकांनी भरलेल्या पिशव्या रस्त्याकडेला टाकून पलायन केल्याचे चौकशीत निष्पन्‍न झाले आहे. लसणी बॉम्बच्या डब्याला चालकाने जोरात लाथाडल्याने मोठा स्फोट झाल्याचेही उघड झाले आहे. सात शिकार्‍यांच्या टोळीतील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
स्फोटात ट्रकचालकाचा मृत्यू झाल्यामुळे आणि पोलिसांच्या हाती स्फोटके लागल्याची माहिती होताच पाच संशयित शिकारी पसार झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणने रविवारी पहाटे छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयितांकडे चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. चौकशीत दोषी ठरणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

संशयित हातकणंगले, शिरोळ, राधानगरी तालुक्यातील

रानडुकराची शिकार करण्यात शिकार्‍यांची टोळी निष्णात असून हातकणंगले, शिरोळ व राधानगरी तालुक्यातील सराईतांचा समावेश आहे. शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी शेतात धुमाकूळ घालणार्‍या रानडुकरांची शिकार करण्यासाठी संशयित स्फोटके घेऊन महामार्गावरून चिक्‍कोडीकडे   जात होते. उजळाईवाडीजवळील क्रांती चौकात स्थिर पथकातील अधिकारी, कर्मचारी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. संशयितांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी चौकापासून काही अंतरावर वाहन थांबविले. स्फोटकाने भरलेल्या चार  पिशव्या महामार्गावरील नाल्यात फेकून दिल्या. लसणी बॉम्बचा डबा गुलाबी रंगाच्या पिशवीत गुंडाळून उड्डाण पुलाजवळील झुडपात लपवून ठेवला. दहा-पंधरा मिनिटांनंतर संशयित माघारी फिरले.

रात्रीच्या सुमाराला उड्डाणपुलालगत बोगद्याजवळची वर्दळ कमी असते. रात्री साडेदहाच्या सुमारास रॉड तुटल्याने ट्रकही नेमका उड्डाणपुलाजवळच बंद पडला. ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. जाधववाडी) यांनी मित्र आशिष चौगुले यांना बोलावून घेतले. चौगुले रॉड जोडण्याच्या प्रयत्नात असताना ट्रकपासून सात फूट अंतरावर स्फोटाची घटना घडली.

डब्याला लाथाडताच स्फोट : चालकाचा अखेरचा संवाद

स्फोट घडल्यानंतर प्रत्यक्ष उपस्थित असलेले आशिष चौगुले यांच्यावर पोलिसांनी शनिवारी दिवसभर प्रश्‍नांचा भडिमार केला. दत्तात्रय पाटील यांनी ट्रकचा रॉड तुटल्याचे सांगताच 17 मिनिटात उड्डाणपुलाजवळ आलो. दोन, तीन मिनिटे मित्र पाटील यांच्याशी चर्चा केली. रॉड जोडण्यासाठी चाकाजवळ डोकावलो असतानाच काही अंतरावर अचानक स्फोट झाला. सहकारी मित्र तेथेच रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. क्षणार्धात त्यांच्याजवळ गेलो, असता त्यांनी अ‍ॅल्युमिनियमच्या डब्याला लाथेने मारताच स्फोट झाल्याचे सांगितले आणि त्याच क्षणी मान टाकल्याचा जबाब चौगुले यांनी दिल्याचेही स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

टोळीचा दोन दिवसांत पर्दाफाश

रानडुकराच्या शिकारीसाठी जीवघेण्या स्फोटकांचा वापर करणार्‍या टोळ्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्ह्यातील प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. उड्डाणपुलाजवळ स्फोटके, लसणी बॉम्ब ठेवणार्‍या टोळीचा एक-दोन दिवसांत पर्दाफाश होईल, असेही पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

डब्याचे झाकण, गारगोटीचे तुकडे, पावडरही हस्तगत

तीव— स्फोटामुळे डब्याचे अनेक तुकडे झाले. काही तुकडे ट्रकचालकाच्या शरीरात घुसले. तर काही परिसरात फेकले गेले होते. काही अंतरावर डब्याचे झाकणही सापडले आहे. झाकणाचा आकार लक्षात घेता लहान आकाराचे किमान 20 ते 25 लसणी बॉम्ब डब्यात बसू शकतात. त्यामुळे डब्यात 13 ते 15 लसणी बॉम्ब असावेत, अशीही शक्यता वरिष्ठाधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.