होमपेज › Kolhapur › काळे धंदे, तस्करीतील रसदीमुळे गुन्हेगारी बोकाळली

काळे धंदे, तस्करीतील रसदीमुळे गुन्हेगारी बोकाळली

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 1:10AMकोल्हापूर : दिलीप भिसे

देशी, विदेशी बनावट दारूची भेसळ, अमली पदार्थांची तस्करी, तीन पानीच्या नावाखाली बेधडक जुगार, गल्ल्ली-बोळातल्या मटका बुकीच्या टपर्‍या...काळेधंदे आणि तस्करांच्या उलाढालीतीतून मिळणार्‍या रसदीमुळे इचलकरंजीसह परिसरात गुन्हेगारी बोकाळली आहे. व्यापार्‍यांसह श्रमजीवी घटकांना रोखून, शस्त्रांच्या धाकावर लुटणार्‍या संघटित टोळ्यांनी हैदोस माजविला असतानाही स्थानिक पोलिस यंत्रणा हाताची घडी ठेऊन आहेत. सामान्यांच्या हितापेक्षा समाजकंटकांना पोसण्याचा उद्योग सुरू आहे का? अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ख्याती असलेल्या इचलकरंजीसह परिसराला वाढत्या गुन्हेगारीमुळे अवकळा आल्याचे चित्र आहे. सामान्यांसह उद्योजक, व्यापारी, श्रमजीवी घटकात विशेष करून महिलावर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असतानाही गुन्हेगारीला रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात स्थानिक पोलिस यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

जुगारी अड्डे बनलेत सराईतांची आश्रयस्थाने

सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून तडीपार गुंडांची इंचलकरंजीसह शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ,  हातकणंगलेत वर्दळ वाढली आहे. सांगली, कोल्हापूर रस्त्यावरील जुगारी क्‍लबच्या शंभर, सव्वाशेवर अड्ड्यावर गुंडांची रात्रंदिवस ऊठबस असते. किंबहुना टोळ्यांची आश्रयस्थाने बनू लागली आहेत.  

इचलकरंजी पोलिसांवर नामुष्कीची आफत

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या पुढाकाराने आठवड्यापूर्वी विशेष पथकाने शहापुरातील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून म्होरक्यासह साथीदारांना जेरबंद केले. दोन डझनांवर वरिष्ठाधिकारी, अडीचशेवर स्थानिक पोलिसांचा फौजफाटा असतानाही सांगली पोलिसांना कारवाई करावी लागते. हा प्रकार इचलकरंजीतील पोलिस यंत्रणेला नामुष्कीजनक ठरणारा आहे.

छेडछाड, लुटमारीची पर्यटकांनाही झळ

शस्त्रांच्या धाकावर लुटमारी, चेनस्नॅचिंगसह छेडछाडीच्या गुन्ह्यांतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर रस्ता, यड्राव येथील औद्योगिक वसाहत, इचलकरंजी फाटा, तारदाळ माळ, चंदूर रोड, रामलिंग डोंगरावरील लुटमारीच्या घटना धोकादायक ठरत आहेत. पर्यटकांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. पाच वर्षांपूर्वी रामलिंग डोंगरावर सांगलीतील प्रेमीयुगुलावर अत्याचार करून टोळीने दोघांची हत्या केली होती. काहीकाळ हे प्रकार थांबले होते. मात्र, वर्षभरात पुन्हा छेडछाडी, लुटमारीच्या घटनांची मालिका सुरू झाली आहे.

गुन्हेगारी टोळ्यांचा विळखा ठरतोय धोकादायक!

वाढते नागरिकरण, औद्योगिकीकरण यामुळे शहराचा झपाट्याने विस्तार होऊ लागला आहे. शहापूर, तारदाळ, यड्राव, खोतवाडी परिसरात नागरी वस्त्या वाढू लागल्या आहेत. शहापूरही झपाट्याने वाढत असताना संघटित गुंड टोळ्यांसह काळेधंदेवाले, तस्करांच्या टोळ्यांचा पडलेला विळखा धोकादायक ठरणारा आहे.

राजकीय आश्रयामुळे नामचिन गुन्हेगार बनलेत माजोर!

इचलकरंजीसह परिसरात गुन्हेगारांची प्रचंड दहशत वाढली आहे. संघटित टोळ्यांतील संघर्षातून भरचौकात, भरदिवसा मुडदे पडत आहेत. गर्दी, हाणामार्‍या नित्याच्या बनल्या आहेत. तलवारी, कोयत्यासारखी धारदार शस्त्रे चौकात लखलखू लागल्या आहेत. संघटित टोळ्यांच्या धूमश्‍चक्रीत सामान्यांची पोरं भरडली जात आहेत. समाज जीवनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना एकाही राजकीय पक्षनेत्याकडून वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध ‘ब्र’ काढला जात नाही. संघटित टोळ्यांचे कारनामे रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाब आणला जात नाही की, समाजकंटकांविरुद्ध उघड भाष्य केले जात नाही. राजकारण्यांच्या दुटप्पीपणामुळेच गुन्हेगार माजोर बनू लागले आहेत. मात्र, त्याची झळ सामान्यांना बसू लागली आहे.

‘कलेक्शन’वाल्यांचा ड्युटीपेक्षा भानगडीत इंटरेस्ट !

इचलकरंजी, शहापूर परिसरातील बहुतांशी जुगारी अड्ड्यांवर खाकी वर्दीतल्या काही ‘कलेक्शन’वाल्यांची रात्रंदिवस वारी ठरलेली असते. वसुली कोणा व कशासाठी, हा सामान्यांना पडलेला प्रश्‍न... काळेधंदेवाल्यांसह गुन्हेगारीला रोखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पहिल्यांदा वादग्रस्त ‘कलेक्शन’वाल्यांचा शोध घ्यावा, कामापेक्षा भानगडीत गुंतलेल्यांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे समाजात अस्थिरता निर्माण करण्याची सराईतांची हिंमत होणार नाही, अशी सार्वत्रिक चर्चा कानावर पडते.