Fri, Aug 23, 2019 22:02होमपेज › Kolhapur › ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांनी फेकले अधिकार्‍यांच्या अंगावर उडीद

‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांनी फेकले अधिकार्‍यांच्या अंगावर उडीद

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 05 2018 11:54PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

किमान आधारभूत खरेदी केंद्रावर उडीद खरेदी होत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समिती आवारातील पणन विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.  उडीद खरेदी न केल्याच्या निषेधार्थ मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक मनोहर पाटील यांच्या अंगावर उडीद फेकले. 

शिरोळ तालुक्यातील काही शेतकर्‍यांचा उडीद शासनाच्या किमान आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी होत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणन विभागाचे विभागीय उपसरव्यवस्थापक अनिल पवार यांच्याकडे केला. यावेळी पवार यांनी किमान आधारभूतनुसार धान्य खरेदी नाफेडमार्फत मार्केटिंग फेडरेशन करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक मनोहर पाटील यांना कार्यालयात बोलावून घेतले.

यावेळी पाटील यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी, पणनमंत्र्यांनी किमान आधारभूत किमतीनुसार उडीद खरेदीची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात खरेदी का होत नाही? हे शासन फसवे आहे का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्यावर पाटील यांनी उडीद खरेदीबाबत आपल्याकडे अद्याप शासनाचे परिपत्रक आले नसल्याचे सांगितले. यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्‍त झाले.

शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत व्यवस्थापक पाटील यांना येथून बाहेर सोडणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी वरिष्ठ व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना याबाबतचे निवेदन देण्यास सांगितले.

यावेळी सागर शंभूशेटे, भीमगोंडा पाटील, शैलेश चौगुले, संजय चौगुले, अण्णा मगदूम, श्रीकांत पाटील, जितेंद्र पाटील, बाहुबली पाटील, वर्धमान इंगळे, तानाजी वठारे, नितीन टारे आदींची उपस्थिती होती.