Thu, Jun 20, 2019 00:34होमपेज › Kolhapur › अवैध धंद्यांना काय‘द्या’चे पाठबळ!

अवैध धंद्यांना काय‘द्या’चे पाठबळ!

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:13PMकोल्हापूर : दिलीप भिसे

पोलिस दलातील झारीतील  शुक्राचार्यांमुळे बनावट नोटा,  गुटखा कारखाने, कुंटणखाने चालविणार्‍यांना बरकत आली आहे. काळ्याधंद्याची पाठराखण केल्याचा ठपका ठेवून पोलिस ठाण्यांतर्गत आतापर्यंत 27 अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे, पण तरीही काळेधंदे सुरूच आहेत. याचाच अर्थ काळ्या धंद्यांना ‘कायदेशीर’ पाठबळ मिळत आहे. झारीतील शुक्राचार्यांची कीड कायमस्वरूपी हटविण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात काही दिवसांत सहा कुंटणखान्यांचा पर्दाफाश झाला. जुगार अड्ड्यांचा भांडाफोड होत असतानाच बनावट नोटा आणि गुटखा निर्मितीच्या फॅक्टरीचा पंचनामाही नुकताच झाला. एकापाठोपाठ एक काळेधंदे चव्हाट्यावर येऊ लागल्याने जिल्ह्यात काय‘द्या’चे राज्य आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

‘सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनांच्या संहारा’ऐवजी काही अपवाद वगळता समाजाला घातक ठरणार्‍या टोळ्यासह काळ्या धंद्यातील साखळीला पोसण्याचा प्रकार सुरू आहे. हे वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रभारी अधिकार्‍यांवर बजावलेल्या नोटिसीवरून स्पष्ट होते.   स्थानिक पंटरवर जुजबी कारवाई करून स्वत:चा उदोउदो करून घेणार्‍या स्थानिक पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकारी व बिट अंमलदारांच्या नजरेला काळेधंदे येत नाहीत का? मनगटावर महागडे घड्याळ, गळ्यात सोनसाखळी, किमती गॉगल आणि गस्ती (?) साठी बुलेट वापरणार्‍या ‘डीबी’च्या प्रमुखाला काळ्या धंद्यातील उलाढालीची माहिती नसावी, असे म्हणणे हास्यास्पद आहे.   

शिरोळ तालुक्यातील आलास व कनवाड या गावात बनावट नोटांची बेधडक छपाई करून नोटा चलनात आणण्याचा धक्‍कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. कर्नाटकातही टोळीची पाळेमुळे रुजली  आहेत. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड पोलिस ठाण्यांतर्गत यंत्रणेने हातावर घडी कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याचे दिसते.  

जुगार अड्ड्यांची  साखळी!
जिल्ह्यात स्किल गेमच्या नावाखाली तीन पानी जुगार अड्ड्याची साखळी  निर्माण झाली आहे. अशा अड्ड्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. काही तरुणांनी आत्महत्या करून स्वत:ची जीवनयात्रा संपविली आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळा तालुक्यात जुगार अड्ड्याचे मोठे साम्राज्य दिसून येते. इचलकरंजी, शिरोळ परिसरातील किमान सव्वाशेवर जुगार अड्डे आहेत, पण वरिष्ठ अधिकार्‍यासह बीट अंमलदाराला खबरबात नसावी? याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. जुगार अड्ड्यातील भागीदारीचा आरोप ठेवून पोलिस अधीक्षकांनी नुकतीच एका पोलिसावर कारवाईही केली आहे.

गुटख्याचे कारखाने आणि तस्करीही!
बनावट नोटासह गुटख्यांची हातकणंगले, शिरोळ तालुक्यात बेधडक निर्मिती केली जाते.  इचलकरंजीतील जुना चंदूर रोडवरील सराईताच्या अड्ड्यावर अन्‍न, औषध प्रशासन व एलसीबी पथकाने यापूर्वी दोनवेळा छापा टाकून त्याला रंगेहाथ पकडले होते. तरीही त्याची हिंमत? पोलिस यंत्रणेने तस्करीचा पोलखोल करणे गरजेचे आहे. तस्करीचा तपास मर्यादित न ठेवता सारी पाळेमुळे उखडून झारीतील शुक्राचार्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे, पण स्थानिक यंत्रणेची मानसिकता दिसून येत नाही.

काळेधंदेवाल्यासह बनावट नोटा, गुटखा तस्करीविरुद्ध विशेष पथकामार्फत मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही निर्भयपणे काळेधंदेवाल्यांना पाठीशी घालणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- संजय मोहिते,
पोलिस अधीक्षक, कोल्हापूर