Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Kolhapur › बिटकॉईनच्या नाण्यात, लाखो रूपये पाण्यात!

बिटकॉईनच्या नाण्यात, लाखो रूपये पाण्यात!

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 11:24PMकोल्हापूर : सुनील कदम

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून एका टोळीने कोल्हापुरातील व्यापार्‍याला जवळपास 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे आतापर्यंत केवळ पुण्या-मुंबईपर्यंत असलेल्या क्रिप्टो करन्सीचे लोण आता कोल्हापूर जिल्ह्यातही पसरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांमध्ये सर्वच संबंधितांकडून वेगवेगळ्या कारणांनी बाळगण्यात येत असलेली गोपनीयता विचारात घेता, हे सगळे गोलमाल काही कोटी रुपयांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे अनेकजण यामध्ये गुरफटले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने बिटकॉईनसह सर्वप्रकारच्या क्रिप्टो करन्सीवर निर्बंध लादलेले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही काही दिवसांपूर्वी देशातील नागरिकांनी क्रिप्टो करन्सीच्या मोहजालात अडकू नये, असे आवाहन केले आहे. असे असतानाही राज्यात आणि प्रामुख्याने महानगरांमध्ये क्रिप्टो करन्सीचे व्यवहार चोरीछुपे सुरू असल्याचे आढळून येत आहे. गेल्या महिन्यात पुणे आणि मुंबई शहरात या माध्यमातून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. झटपट श्रीमंतीच्या मोहापायी अनेकजण या मोहजालात फशी पडत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी बुडालेल्या काही नॉन बँकिंग कंपन्यांचे दलालच यामध्येही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठ-दहा वर्षांच्या कालावधीत जगभरातील काही मंडळींनी बिटकॉईनसारखी वेगवेगळी चलने जागतिक बाजारपेठेमध्ये आणलेली आहेत. कोल्हापुरात उघडकीस आलेल्या प्रकरणात ‘झिपकॉईन’ हे नवीनच नाव आता चर्चेत आले आहे. ऑनलाईन व्यवहार करणार्‍या जगभरातील शेकडो, हजारो, लाखो आणि कोट्यवधी लोकांनी या आभासी चलनांचा वापर सुरू केल्यानंतर या आभासी चलनांचा भाव चांगलाच वधारत निघाला आहे. बिटकॉईन या आभासी चलनाचा आजघडीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव जवळपास पंधरा लाखांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. जगाच्या पाठीवर जवळपास 90 आभासी चलने कार्यरत झाली असून, त्यापैकी प्रमुख 16 चलने भारतीयांच्या वापरात आली आहेत. या सोळापैकीही प्रामुख्याने बिटकॉईन, इथेरियम, रिपलकॉईन, ब्रिटकॉईन आणि लिटकॉईन या पाच आभासी चलनांनी भारतीयांना जास्त भुरळ घातलेली आहे. आभासी चलनांमधील या गुंतवणुकीचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध होत नसल्याने दोन नंबरची कमाई असणार्‍या लोकांसाठी आभासी चलनांमधील गुंतवणूक सोयीची वाटत आहे. अशा प्रकरणात गुंतवणूकदारांची फसगत झाली, तरी बोभाटा होण्याची शक्यता नसल्यामुळे आभासी चलनांच्या दलालांनी त्या दिशेने आपला मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. कोल्हापुरातील बिटकॉईन प्रकरणातील व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.