Sat, Jul 20, 2019 09:29होमपेज › Kolhapur › ‘झिपकॉईन’चा ६५ कोटींचा गंडा

‘झिपकॉईन’चा ६५ कोटींचा गंडा

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बिटकॉईनच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या टोळीच्या कारनाम्याची व्याप्ती वाढत आहे. तीन लाख रुपयांपेक्षा जादा गुंतवणूक केलेल्या साडेतीनशेवर गुंतवणूकदारांना झळ सोसावी लागली आहे. चौकशीतील माहितीनुसार फसवणुकीचा आकडा 65 कोटींवर पोहोचल्याचे तपासाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. सूत्रधार नेर्लेकर बंधू, संजय कुंभारसह 38 जणांची बँक खाती बुधवारी सील करण्यात आली. हुपरी, शिरढोण येथील घरांवर छापे टाकून तपासणी करण्यात आली आहे.

कथित कंपनीचा सर्वेसर्वा अनिल नेर्लेकर, राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार यांच्या वापरातील लाखो रुपये किमतीच्या दोन आलिशान मोटारही स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेतल्या आहेत. आणखी काही किमती वाहनांचा शोध घेण्यात येत आहे, असे तपासाधिकारी तथा ‘एलसीबी’चे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.

बिटकॉईनचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी संशयितांनी सरासरी दहा ते पंधरा टक्के कमिशनवर नियुक्‍त केलेल्या 25 एजंटांमार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटक, गोव्यातील व्यावसायिकांना गाठून गुंतवणुकीस भाग पाडण्यात आल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

‘झिपकॉईन क्रिप्टो’च्या लक्ष्मीपुरीतील कार्यालयावर ‘एलसीबी’ने छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जमा झालेली कोट्यवधींची रक्‍कम कोठे मुरविण्यात आली आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे. मालमत्तांसह अन्य कारणांसाठी नातेवाईक, मित्रांच्या नावे गुंतवणूक करण्यात आल्याचा संशय आहे.

नेर्लेकर बंधू, कुंभार यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक, विश्‍वासू मित्र अशा एकूण 38 जणांची पोलिसांनी यादी तयार केली आहे. त्या सर्वांची बँक खाती सील करण्यासाठी विविध बँकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विश्‍वासू मित्रांच्या नावे जमिनीचे खरेदीचे व्यवहार करणार्‍या सात जणांची नावेही निष्पन्‍न झाली आहेत. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई होईल.

10 गुंतवणूकदारांनी साधला संपर्क

‘झिपकॉईन’ फसवणूकप्रकरणी भागीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच कंपनीत गुंतवणूक केलेल्या 10 व्यावसायिकांनी कागदपत्रांसह पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला आहे. त्यांचाही जबाब नोंदविण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

पोलिस कोठडीत वाढ

राजेंद्र नेर्लेकरसह तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अन्य फरारींचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत, असेही मोहितेम्हणाले.