Wed, Jul 17, 2019 18:44होमपेज › Kolhapur › बिनपगारी 8970 शिक्षक, कर्मचार्‍यांना वेतनाची भेट

बिनपगारी 8970 शिक्षक, कर्मचार्‍यांना वेतनाची भेट

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 10:12PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

शिक्षकदिनी राज्यातील शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करून शासनाने कित्येक वर्षे बिनपगारी काम करणार्‍या विनाअनुदानित शाळांना अनोखी भेट दिली आहे. याचा राज्यातील 8970 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतनाचा लाभ होणार आहे. 

1 व 2 जुलै रोजीच्या पात्र शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात अनुदानासाठी शिक्षक संघटनांना दोन वर्षे रस्त्यावर संघर्ष करावा लागला. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी शासनाने अनुदान वितरणाचा आदेश काढल्याने शिक्षकांच्या थोड्या आशा पल्‍लवित झाल्या आहेत. 631 माध्यमिक शाळा व 556 वर्ग तुकड्या, तसेच 158 प्राथमिक शाळा व 134 वर्ग तुकड्यांमधील 8970 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून बिनपगारी असलेल्यांना उशिरा का होईना थोडा दिलासा मिळाल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. मात्र, अनुदानप्राप्त शाळांनी 19 सप्टेंबर 2016 मधील अटी व शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने 9 मे 2018 च्या आदेशातून वगळलेल्या राज्यातील 51 माध्यमिक शाळा व 19 माध्यमिक शाळेतील 54 वर्ग तुकड्यांना अनुदान मंजूर केलेले नाही. यात 551 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे. संबंधित शाळांची फेरतपासणी झाली असून, शिक्षण आयुक्‍तांकडून चौकशी अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. परंतु, या शाळांना अनुदान मंजूर करण्याच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांचा जीव टांगणीला लागला आहे. 

अनुदान मंजूर शाळांची आकडेवारी

 प्राथमिक शाळा -     158

 प्राथमिक शाळांच्या तुकड्या -     134

 माध्यमिक शाळा -     631

 माध्यमिक शाळांच्या तुकड्या - 556

 दोन्हींमधील शिक्षक, कर्मचारी - 8970