होमपेज › Kolhapur › बिद्रे हत्या; तपास अधिकारी अल्फान्सोंना मुदतवाढीचा प्रस्ताव

बिद्रे हत्या; तपास अधिकारी अल्फान्सोंना मुदतवाढीचा प्रस्ताव

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:37AMकोल्हापूर : दिलीप भिसे

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या तपासाधिकारी तथा नवी मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे शनिवारी दाखल झाला. बिद्रे-गोरे हत्येचा पूर्ण तपास आणि दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तपासाची जबाबदारी अल्फान्सोंकडे सोपविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्या प्रस्तावाला महासंचालकांनी सकारात्मकता दर्शविली आहे. काही दिवसांत याबाबत स्पष्ट आदेश होतील, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होम सेक्रेटरी श्रीवास्तव यांना निर्देश दिल्याने वरिष्ठस्तरावर चौकशीला गती देण्यात आली आहे.

अल्फान्सो यांची तपासाधिकारी म्हणून सोपविलेली तीन महिन्यांची मुदत 20 एप्रिलला संपुष्टात आली असली, तरी राज्यभर संवेदनशील ठरलेल्या बिद्रे-गोरे हत्येच्या चौकशीत कोणत्याही स्थितीत खंड न पडता तपासाची यंत्रणा अखंडित चालूच ठेवण्याच्या सूचना अल्फान्सो यांना देण्यात आल्या आहेत.

अश्‍विनी बिद्रे यांचे वडील व निवृत्त जवान जयकुमार बिद्रे यांनी मुलीला न्याय देण्यात सरकार असमर्थ ठरत आहे, असा आरोप करून आपण मंत्रालयात कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याचा आठवड्यापूर्वी इशारा दिला होता. या घटनेची मुख्यमंत्र्यांसह गृहखात्याने गंभीर दखल घेऊन जयकुमार बिद्रे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. हत्येच्या तपासाबाबत सरकार पूर्णत: सकारात्मक असल्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आले आहे.

निवृत्त जवान बिद्रे यांच्या मागणीनुसार अल्फान्सो यांची कायमस्वरूपी तपासाधिकारी म्हणून नियुक्तीच्या मागणीच्या अनुषंगाने वरिष्ठस्तरावर झालेल्या चर्चेअंती हत्येचा तपास पूर्ण होऊन खटल्याची न्यायालयात सुनावणी होईपर्यंत तपासाची सूत्रे त्यांच्याकडे ठेवण्याबाबत एकमत झाल्याचे समजते.

कटरसदृश हत्यार हस्तगत

बिद्रे-गोरे यांची अमानुष हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी वूडकटरने मृतदेहाचे तुकडे करून खाडीत फेकून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तपास यंत्रणांकडून वूडकटरच्या शोधासाठी कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज परिसरात शोध घेण्यात आला होता. तपासाधिकार्‍यांनी कटरसदृश हत्यार हस्तगत केल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

अभय कुरूंदकर, राजेश पाटीलसह संशयितांवर 2 जूनला दोषारोपपत्र

अश्‍विनी बिद्रे-गोरे हत्येप्रकरणी मुख्य संशयित व निलंबित वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर, राजेश पाटील, महेश फळणीकरसह अन्य संशयितांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता 302, 201, 34 अन्वये येत्या 2 जूनला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. 

कोल्हापूर, सांगलीतील अधिकारी, पोलिस, सहकारी मित्र कोण?

संशयित अभय कुरूंदकरच्या मोबाईल ‘सीडीआर’द्वारे त्याच्याशी सतत संपर्कातील काही अधिकारी, पोलिस आणि मित्रांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यात कोल्हापूर येथील एक निरीक्षक, दोन पोलिस कर्मचारी, सांगलीतील एक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस कर्मचारी तसेच कुपवाड (ता.मिरज) येथील तीन सहकारी मित्रांची नावे पुढे आली आहेत. हातकणंगले तालुक्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलची झालेली बदलीही कुरूंदकरने दोनवेळा मुंबईतून रद्द केली होती. संबंधितांवरील कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत, असेही सांगण्यात आले.