Sun, Aug 25, 2019 12:52होमपेज › Kolhapur › ‘भीमा कोरेगाव’चा राजकीय फायदा उठवला जातोय

‘भीमा कोरेगाव’चा राजकीय फायदा उठवला जातोय

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:32AMकागल : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची अंमलबजावणी सरकारने केली असती तर भारत देश यापूर्वीच महासत्ता बनला असता. सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये एक समूह दुसर्‍या समूहाकडे संशयाने पाहत आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा राजकीय पक्ष फायदा घेत आहेत. तो थांबवून शांततेच्या मार्गाने जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.  

मुरगुड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आलेल्या भीमराव आंबेडकर यांनी कागल येथील छ. शाहू कारखान्याच्या कार्यालयाला भेट दिली असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी छ. शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी समरजितसिंह घाटगे, वीरेंद्रसिह घाटगे उपस्थित होते.

भीमराव आंबेडकर म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे काम संपूर्ण देशभर सुरू आहे. मी राजकीय नाही सामाजिक आणि धार्मिक अजेंडा घेऊन काम करीत आहे. बौद्ध धर्माचा प्रसार, प्रचार केला जात आहे. सध्या राज्यातील वातावरण फारसे चांगले नाही. एकमेकांकडे संशयाने पाहिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर छ. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन घराणी एकत्र आल्यानंतर चांगला संदेश जाईल. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. त्यामुळे आम्ही बोलू शकतो आणि तशी आमची नैतिकता आहे. सध्या समाजामध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शाहू महाराजांनी त्या काळात प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पाऊल उचलेले होते. मानगाव परिषदेनंतर प्रथमच दोन्ही घराणी एकत्र येत आहेत. सध्याच्या वातावरणात चांगला संदेश जाईल, एकत्र येणे ही काळाची गरज आहे. यामध्ये सर्वजण सहभागी झाले आहेत.