Sun, Mar 24, 2019 17:24होमपेज › Kolhapur › ‘भीमा-कोरेगावप्रकरणी भिडे यांचा संबंध नाही’

‘भीमा-कोरेगावप्रकरणी भिडे यांचा संबंध नाही’

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:32AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगावप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक प्रमुख संभाजी भिडे यांचा कोणताही संबंध नाही. त्यांच्यावर खोडसाळपणे तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करणारे व दाखल करून घेणार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने निवेदनाद्वारे शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे, भीमा कोरेगाव प्रकरणात भिडे गुरुजी यांचे नाव नाहक गोवले आहे. हा प्रकार घडण्यापूर्वी त्यात गुरुजींनी कणभरही लक्ष घातलेले नाही. कोठे सभा घेतलेली नाही. कोणतेही आवाहन केलेले नाही. कोणतेही वक्‍तव्य केलेले नाही. मात्र, खोडसाळपणे त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्य महाराष्ट्रात जोमाने वाढत आहे. हे काही असंतुष्ट, देशविघातक, जातीयवादी शक्‍तींना बघवत नसल्याने, राजकीय हेतूने प्रेरित होऊन पूर्वनियोजितपणे गुरुजींचे नाव गोवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार पुन्हा एकदा केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाह विठ्ठल पाटील यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे.