Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Kolhapur › तोडफोडीत काळे धंदेवाले, गुन्हेगार : नांगरे-पाटील

तोडफोडीत काळे धंदेवाले, गुन्हेगार : नांगरे-पाटील

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 8:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर बंद काळात अनपेक्षित उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीमागे नेमका बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे, असे स्पष्ट करीत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी तोडफोड, दगडफेकीच्या घटनांमध्ये काळे धंदेवाले, सराईत गुन्हेगार सक्रिय होते, असेही पोलिस चौकशीत उघड झाले आहे. सीसीटीव्हीचे फुटेजही तपास यंत्रणांना उपलब्ध झाले आहे, असे सांगितले.

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनाच्या वतीने जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. जिल्ह्याचा लौकिक, सामाजिक सलोख्याची परंपरा लक्षात घेता कोणताही अनुचित व गंभीर प्रकार घडणार नाही, याची खात्री होती; पण घडलेल्या घटना गंभीर व वेदनादायक ठरल्या आहेत. कायदा हातात घेऊन अस्थिरता निर्माण करणार्‍या कृत्याची दखल घेऊन कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. त्यात कोणत्याही स्थितीत तडजोड होणार नाही, असेही नांगरे-पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्पष्ट केले.

वाचा आंबेडकरी एकजुटीला घाबरून पोलिसांची कारवाई

शहर, जिल्ह्यातून सुमारे 200 सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध झाले आहे. प्रत्यक्ष तोडफोड, दगडफेकीत सक्रिय सहभागी असलेल्यांची नावे निष्पन्न होत आहेत. त्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील युवकांसह सराईत टोळ्यांतील गुन्हेगार सहभागी असल्याचे उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे शहर, जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर प्रसारित माहिती संकलित करण्यासाठी तपास यंत्रणा गतिमान झाली आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. दोषी अ‍ॅडमिनच नव्हे, तर ग्रुपमधील सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

वाचा : कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू : मुख्यमंत्री

भीमा कोरेगावप्रकरणी अकरा जणांना अटक

तोडफोडप्रकरणी जिल्ह्यात अटकसत्र सुरूच आहे. आजअखेर 134 जणांना अटक करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव येथील दंगलीप्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.

वाचा : भिडे गुरुजींबद्दल तोंड सांभाळून बोला : खा. उदयनराजेंची तंबी

फुलेवाडी येथील एका बंगल्यात बंदच्या आदल्या दिवशी (मंगळवारी) काही कार्यकर्त्यांची व्यापक बैठक झाल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, मिरजेतील काही मंडळींचा त्यात समावेश होता. बैठकीचा नेमका उद्देश, नेमकी चर्चा याची सर्वंकष माहिती घेण्यात येत आहे. हातात सर्व कायदेशीर पुरावे ठेवूनच संबंधितांवर भारतीय दंडविधान संहिता कलम 120 (ब) अन्वये कट रचल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असेही नांगरे-पाटील म्हणाले.

वाचा : अ‍ॅट्रॉसिटीचा वाईट वापर होतोय : भिडे