होमपेज › Kolhapur › झालं गेलं विसरू... सामाजिक सलोखा जपू!

झालं गेलं विसरू... सामाजिक सलोखा जपू!

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 1:22AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याचा पुरोगामी लौकिक अन् सहिष्णुतेला बांधिल राहून झालं गेलं विसरून भविष्यात सामाजिक सलोखा जपण्याचा निर्धार पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सोमवारी दोन्ही गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. पोलिस मुख्यालयात दोन सत्रात पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये दोन्हीही गटाकडून सकारात्मक सूर उमटला.

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला तोडफोड, दगडफेकीमुळे  गालबोट लागले. वाहनांची तोडफोड, शेकडो दुकाने, फर्मवरील दगडफेकीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही गटातील प्रमुखांसह दोन हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

शिवजयंती, आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आंबेडकरी समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रमुखांच्या पोलिस मुख्यालयात दोन स्वतंत्र बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.

नांगरे-पाटील, संजय मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षकांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रा.शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, सतीशचंद्र कांबळे, शाहीर उदय भोसले, शामराव गायकवाड, विजय चव्हाण, सुरेश कांबळे, अनिल चव्हाण, नंदकुमार शिंगे, अविनाश बनगे आदींची उपस्थिती होती. 

हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संघटनांच्या वतीने महेश जाधव, ओंकार जोशी, विक्रम जरग, राजकुमार पाराज, सुजित चव्हाण, अ‍ॅड. संभाजी नाईक, बबन यादव, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, संभाजी साळुंखे, अनुप हल्ल्याळकर,नागेश पाटील, सोमेश्‍वर वाघमोडे, नीलेश म्हाळुंगेकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात गावोगावी बैठका घेणार

जिल्ह्यात कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत, यासाठी अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गावोगावी जाऊन बैठका घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असेही पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, आर,आर.पाटील, डॉ.प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, कृष्णा पिंगळे उपस्थित होते.