Sat, Jul 20, 2019 22:03होमपेज › Kolhapur › भीमा कोरेगाव  प्रकरण : कायदा हातात घेऊ नका

भीमा कोरेगाव  प्रकरण : कायदा हातात घेऊ नका

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 04 2018 8:54PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात झालेली दगडफेक ही पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लावणारी आहे. निष्पाप नागरिक, तसेच दुकाने व वाहनांवर दगडफेक करणार्‍यांची गय केली जाणार नाही. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापुरात मोर्चाच्या काळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना शासन योग्य ती भरपाई देईल, अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली. 

महाद्वार रोड, गुजरी, दसरा चौक, सीपीआर, सिद्धार्थनगर परिसरातील दगडफेक केलेल्या भागांची पाहणी त्यांनी केली. यावेळी आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, शहर पोलिस  उपअधीक्षक प्रशांत अृमतकर उपस्थित होते.

शाहूपुरी व गुजरी येथील जैन बांधव व व्यापार्‍यांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा आहे. या जिल्ह्यात कधीही जातीय तेढ निर्माण झाली नाही. वाहने, दुकान, घरे व हॉस्पिटल्स आदींच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दोषींवर कारवाई केली जाईल. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बंदला लागलेले हिंसक वळण निषेधार्ह आहे.  पोलिसांकडे असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोषींवर कारवाई केली जाईल. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत; पण नागरिकांकडेही काही मोबाईलवर चित्रीकरण असेल, तर ते त्यांनी पोलिस प्रशासनाला द्यावे, असे आवाहन केले. 

सिद्धार्थनगर येथे नागरिकांशी संवाद साधनाता ना. पाटील म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेचा मी निषेध करतो. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. कोल्हापुरात अशा प्रकारची घटना कधीच झाली नव्हती. दोन दिवसांत वातावरण शांत होईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जातीयवाद निर्माण करून जिल्ह्यातील विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाठ्याकाठ्यांनी प्रश्‍न सुटत नाहीत. त्यामुळे शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या बंदला नागरिकांचा पाठिंबा होता; पण काही समाजकंटकांनी दगडफेक करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सीपीआर येथे उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली. 

सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

कोल्हापूर बंद बुधवारी (दि.3) कडकडीत झाला. या बंदमुळे जिल्ह्यातील सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. शहरातील बाजारपेठांतील चाळीस कोटी रुपयांच्या उलाढाल यानिमित्ताने ठप्प झाली. गुरुवारी सकाळपासून पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.  

जिल्ह्यात कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी आदी प्रमुख मोठ्या बाजारपेठा आहेत.  कापड, सोने-चांदी, अन्‍न-धान्य, बांधकाम साहित्य आदी कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल दररोज होते. बुधवारी झालेल्या बंदमुळे बाजारपेठांतील व्यवहार बंद राहिले. सव्वाशे कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून देण्यात आली. गुरुवारी पुन्हा सर्व व्यवहार पूर्वतत सुरू झाले.