Sat, Nov 17, 2018 18:26



होमपेज › Kolhapur › नऊ कोटींच्या 'युवराज'ने जिंकली मने!

नऊ कोटींच्या 'युवराज'ने जिंकली मने!

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 29 2018 1:40AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

यंदाच्या भीमा कृषी प्रदर्शनात हरियाणाच्या ‘युवराज’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या 9 कोटी रुपये किमतीच्या मुर्‍हा जातीच्या रेड्याने कृषी शौकिनांची मने जिंकली. रेडा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने अखेर त्याला तंबूतून बाहेर काढून  फिरवण्यात आले. हजाराहून अधिक जातीवंत पशू-पक्षी, नावीन्यपूर्ण कृषी औजारे, गृहोपयोगी वस्तू आणि खाद्याच्या नानाविध प्रकारांनी सजलेल्या स्टॉलवर शौकिनांची तुडुंब गर्दी झाल्याने तिसर्‍या दिवशी प्रदर्शन हाऊसफुल्ल झाले. लाखो लोकांनी भेट दिली असून, 30 कोटींची उलाढाल झाल्याचा संयोजकांचा दावा आहे.

26 जानेवारीपासून मेरी वेदर ग्राऊंडवर प्रदर्शन सुरू आहे. याची सांगता व बक्षीस वितरण समारंभ सोमवारी सायंकाळी 4 वाजता होत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील असणार आहेत. यावेळी चॅम्पियन शो, पीक स्पर्धा, जनावरे स्पर्धेतील विजेत्यांना गौरवले जाणार आहे.

प्रदर्शनात सहा वर्षांचा मुर्‍हा जातीचा रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याला बघ्यांची गर्दी जास्त होत असल्याने हा रेडा स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कृषी प्रदर्शनात पंढरपुरी रेडा, म्हशीसह लाल कंधारी गायी, खिलारी बैल, शेळ्या, कडकनाथ कोंबड्या, बदक, काठेवाडी घोडे, नाचणारे घोडे पाहण्यासाठीही शौकिनांच्या उड्या पडल्या आहेत. याशिवाय नावीन्यपूर्ण कृषी औजारे, स्प्रे पंपांसह कडबा कुट्टी, ठिबक, मिल्किंग मशीन, सोलर पंप, ट्रॅक्टर, मिनी ट्रेलर, पॉवर ट्रिलरही शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रदर्शनात शेतकर्‍यांनी पिकवलेली केळी, ऊस, भोपळा  कुतूहलाचा विषय ठरले आहेत. 

शेतकर्‍यांना मार्गदर्शन

प्रदर्शनात शेतकर्‍यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आधुनिक शेतीचे धडेही तज्ज्ञांमार्फत देण्यात आले. ऊस उत्पादनासाठी आधुनिक सिंचनातून पाणी व खत व्यवस्थापन या विषयावर विजय माळी यांनी मार्गदर्शन केले. संरक्षित भाजीपाला व फूलशेती लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. आर. आर. हासुरे यांनी उपयुक्त टिप्स दिल्या.