Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Kolhapur › पेपरला मुकावे लागणार 

पेपरला मुकावे लागणार 

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:06AMभडगाव  : वार्ताहर 

बारावीच्या बोर्ड परीक्षेला बुधवारपासून सुरुवात होत आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावे लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने  विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. विद्यार्थ्याला परीक्षेला येण्यास एक मिनिटही उशीर झाल्यास खोलीत प्रवेश मिळणार  नाही. दहावी आणि बारावीच्या परीक्षांत प्रश्‍नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्या वर्षी गाजल्यानंतर परिणामी असे प्रकार रोखण्यासाठी, यावर्षीपासून परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवीन नियमांमुळे   शिस्त निर्माण होईल व गैरप्रकारांना आळा घातला जाणार आहे.  

 परीक्षेला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही, तसेच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल; मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्‍नपत्रिका संबंधित पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आगोदर प्रश्‍नपत्रिकांचे वाटप करण्यात येते, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो;  पण आता परीक्षेची वेळ सुक्षीं झाली की विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्‍त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल; मात्र उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करून ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.

सावळागोंधळ थांबणार

 यापूर्वी प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे परीक्षा केंद्रावर फोडले जात होते; परंतु आता या वर्षीपासून विद्यार्थांना परीक्षा खोलीमध्येच विध्यार्थांच्या समोर प्रश्‍नपत्रिकांचे गठ्ठे फोडून प्रश्‍नपत्रिका वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा काळातील सावळागोंधळाला आळा बसण्यास मदत होणार आहे.    बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. राज्य मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार असून बारावीसाठी कोल्हापूर विभागातून सुमारे एक लाख तीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.