भडगाव : वार्ताहर
उन्हाचा तडाखा, अंगातून पडणार्या घामाच्या धारा अन् ऊसतोडणी मजुरांची कमतरता अशा परिस्थितीत चौदा-सोळा महिने जपलेले ऊस पीक डोळ्यांदेखत पेटवावे लागत आहे. मजुरांअभावी यंदाचा गळीत हंगाम लांबत आहे. परिणामी, नोंदीत ऊस उचलण्यासाठी साखर कारखान्यांच्या यंत्रणेला कसरत करावी लागत असून, ऊसतोडणी मजूर एका ट्रिपसाठी तीन ते चार हजार रुपये मागत आहेत. कागल तालुक्यात अद्याप सुमारे 2 लाख 96 हजार टन ऊस शिल्लक आहे.
काही ठिकाणी मजूरटंचाईमुळे उभा ऊस पेटवून तोडला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, बिद्री साखर कारखान्याकडे कागल तालुक्यात 16 हजार, राधानगरी 13 हजार, भुदरगड 17 हजार, तर करवीर 3 हजार असा समारे 55 हजार ने. टन उभा ऊस शिल्लक असून, सोनगे, बानगे, मुरगूड, गारगोटी, सरवडे, सोळांकूर, तुरंबे या शेती विभागीय कार्यालयांकडे ऊसतोडीची अपुरी यंत्रणा असल्यामुळे जादा ऊस शिल्लक आहे, तर आजअखेर या कारखान्याचे पाच लाख 12 हजार मे. टन गाळप झाले आहे.
मंडलिक साखर कारखान्याकडे ऊसतोडणी यंत्रणा बर्यापैकी असून, या कारखान्याने आजअखेर 4 लाख 25 हजार मे. टन गाळप केले असून, या कारखान्याकडे सुमारे 50 हजार मे. टन ऊस अद्याप शिल्लक आहे. या साखर कारखान्याचा गळीत हंगाम 10 ते 15 मार्चअखेरपर्यंत चालणार आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे नोंदीत उसापैकी केवळ अकरा हजार टन शिल्लक आहे. या कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेत 6 लाख 67 हजार मे. टन गाळप केले आहे.
या कारखान्याचा हंगाम 10 मार्चपर्यंत चालणार आहे. शाहू साखर कारखान्याकडे सार्वाधिक 1 लाख 80 हजार टन ऊस शिल्लक आहे. आजअखेर 6 लाख 48 हजार मे. टन गाळप झाले. या कारखान्याचा गळीत हंगाम तालुक्यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत मार्चअखेरपर्यंत चालणार आहे. चालू गळीत हंगामामध्ये या चार साखर कारखान्यांच्या परजिल्ह्यातील सुमारे पावणेदोनशे ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांनी पाठ फिरवल्याने वाहनमालकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.