Tue, Jun 18, 2019 21:10होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत बेटिंग रॅकेट

इचलकरंजीत बेटिंग रॅकेट

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:27PMइचलकरंजी : प्रतिनिधी

मटका, जुगार क्‍लब, बनावट दारू-गुटखा अशा अनेक अवैध व्यवसायांनी वस्त्रनगरीला विळखा घातला असतानाच, शनिवारी मध्यरात्री शिवाजीनगर पोलिसांनी आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणार्‍या अड्ड्यावर छापा टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला. या प्रकरणात काही बड्या धेंडांचा हात असल्याने त्यांना सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यावर राजकीय नेत्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. 

आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणारी टोळी इचलकरंजी शहरात कार्यरत आहे. परंतु, टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आले आहे. या बेटिंगमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. आयपीएल सामन्यांवर घोडकेनगरातील गडकरी याच्या इमारतीत बेटिंग घेण्यात येत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्‍तपणे कारवाई करत या इमारतीवर छापा टाकला. तेव्हा आयपीएल सामन्यांवर मोबाईलवर बेटिंग घेण्यात येत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स या सामन्यावर बेटिंग घेण्यात येत होते.

पोलिसांनी बेटिंग घेणार्‍यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 12 हजारांची रोकड, 10 मोबाईल संच, लॅपटॉप, एलईडी व रोख रक्‍कम असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी राजेंद्र दुंडाप्पा गडकरी (वय 37, रा. घोडकेनगर) व त्याचा साथीदार अमजद खलिफा याच्यावर गुन्हा नोंद केला व राजेंद्र गडकरी यास अटक केली, तर त्याचा साथीदार खलिफा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गडकरी याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनावर मुक्‍तता करण्यात आली. क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणार्‍या घोडकेनगरातील अड्ड्यावर छापा पडल्याचे समजताच अवैध व्यवसायातील व राजकारणातील लोकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. यात काही बड्या धेंडांचा हात असल्याचे उघड झाल्याने त्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. या कारवाईवेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. काही राजकीय नेत्यांचा त्या ठिकाणी वावर होता.

Tags : Kolhapur, Betting Racket, Ichalkaranji