Wed, Nov 14, 2018 08:01



होमपेज › Kolhapur › खंडपीठ : मंत्रिमंडळ ठरावाच्या मागणीसाठी मुंबईत आज बैठक

खंडपीठ : मंत्रिमंडळ ठरावाच्या मागणीसाठी मुंबईत आज बैठक

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:45AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी बुधवारी (दि. 14) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात दुपारी दोन वाजता बैठक होत आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, असा राज्य मंत्रिमंडळाचा ठराव द्यावा, अशी प्रमुख मागणी या बैठकीत केली जाणार आहे.

खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांचा लढा सुरू आहे. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूरला खंडपीठ होण्याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनेही पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे; पण खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, असा राज्य मंत्रिमंडळाचा स्वयंस्पष्ट ठराव आवश्यक आहे. या बैठकीला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण भांदिगरे, सचिव अ‍ॅड. किरण पाटील, अ‍ॅड. विक्रम झिटे, अ‍ॅड. रोहन पाटोळे, अ‍ॅड. संग्राम पाटील, अ‍ॅड. दीप्ती घाटगे, अ‍ॅड. सतीश कुंभार यांच्यासह काही ज्येष्ठ वकील आणि खंडपीठ कृती समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.