Tue, Apr 23, 2019 20:24होमपेज › Kolhapur › खंडपीठ कृती समिती सोमवारी पालकमंत्र्यांना भेटणार

खंडपीठ कृती समिती सोमवारी पालकमंत्र्यांना भेटणार

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:35AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापुरात सर्किट बेेंच स्थापनेबाबत सकारात्मक अहवाल दिल्याची माहिती मिळाली आहे. शासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊ. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळणेबाबत प्रयत्न करू. सकारात्मक चर्चा न झाल्यास 1 फेबु्रवारीपासून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा खंडपीठ नागरी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी दिला. 

खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा ठरविणेसाठी खंडपीठ नागरी कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नागरी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार होते. बैठकीत विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आपली मते व्यक्‍त केली. 

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांनी खंडपीठ कृती समितीची भूमिका मांडली. ते म्हणाले,  सहा जिल्ह्यातील वकिलांशी 22 डिसेंबरला सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, अद्याप भेट मिळालेली नाही. 1 जानेवारी 2018 ते 1 फेबु्रवारी 2018 या महिन्याच्या कालावधीत नेत्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेण्यात येणार आहे. या कालावधीत चर्चा न झाल्यास 1 फेबु्रवारीपासून आंदोलनाची तयारी वकील आणि पक्षकारांना करावी लागेल, असे प्रतिपादन अ‍ॅड. शिंदे यांनी केले. 

लढ्याखेरीज पर्याय नाही : अ‍ॅड. महादेवराव आडगुळे

माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत नाही हे दुर्दैवी आहे. खंडपीठासाठी गेले 35 वर्षे लढा सुरू असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नाही. शासनाने यापूर्वी 1100 कोटी निधी देण्याची घोषणा केली. पण, बजेटमध्ये अशी तरतूद झाली नाही. यामुळे हे आश्‍वासन अद्याप हवेतच आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहा जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांची संख्या आणि सर्किट बेंचची आवश्यकता याचा अभ्यास केल्यास त्यांना गांभीर्य समजेल. यापुढे लढ्याशिवाय कोल्हापूरच्या जनतेकडे पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. 

न्यायमूर्तींचा अहवाल सकारात्मक : अ‍ॅड. शिवाजीराव राणे

कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांनी सकारात्मक अहवाल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खंडपीठाची इमारत उभारणीसाठी जागेची तरतूद, कर्मचारी नेमणूक याची चर्चा आता झाली पाहिजे. 

तीनही खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी : जयकुमार शिंदे

जयकुमार शिंदे म्हणाले, जिल्ह्याच्या 3 खासदारांची खंडपीठाबाबत भूमिका स्पष्ट दिसत नाही. तीनही खासदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची एकत्रित बैठक होणे आवश्यक आहे. खंडपीठ मागणीबाबत दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. 

प्रत्यक्षकृती आवश्यक : निवासराव साळोखे

निवासराव साळोखे म्हणाले, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृती समिती यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली पाहिजे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे, पण प्रत्यक्ष कृती होणे महत्त्वाचे ठरेल. 

आंदोलनाची तयारी ठेवा : अनिल घाटगे

खंडपीठ कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत. गेले सहा महिने भेट होऊ शकत नाही हे खेदजनक वाटते. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. असे होत नसल्यास 1 फेबु्रवारीपासून आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल, असे मत कृती समितीचे सदस्य अनिल घाटगे यांनी मांडले. 
यावेळी अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, राजेंद्र किंकर, अजित मोहिते, पंडितराव सडोलीकर, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव यांनी आपापल्या सूचना मांडल्या. 15 जानेवारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पुढील आंदोलन अधिक तीव्र करावे अशा सूचना यावेळी उपस्थितांनी मांडल्या. बैठकीला अ‍ॅड. धनंजय पठाडे, रवींद्र जानकर, बाळासाहेब पाटील, कोमल राणे, रवींद्र जानकर, आसावरी कुलकर्णी, सतिश कुंभार, बाबा पार्टे, किसन कल्याणकर, पद्माकर कापसे, नंदकुमार चोपदार यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.