Thu, Jul 18, 2019 08:23होमपेज › Kolhapur › बेलवळे दुहेरी खून : पिता-पुत्रास जन्मठेप

बेलवळे दुहेरी खून : पिता-पुत्रास जन्मठेप

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:53AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे राजकीय वैमनस्यातून झालेल्या दुहेरी खुनातील आरोपी पिता-पुत्रांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (1) एस. डी. जगमलानी यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आनंदा माणकू पाटील (वय 63) व मारुती आनंदा पाटील (32) अशी आरोपींची नावे आहेत. एक जुलै 2012 रोजी झालेल्या गोळीबारात रवींद्र आनंदा डोंगळे (27), प्रकाश विलास पाटील - कोतेकर (24) या दोघांचा मृत्यू झाला होता. 

कागलमधील बेलवळे खुर्द गावातील संजय घाटगे व हसन मुश्रीफ गटातील कार्यकर्त्यांत 30 जून 2012 साली वाद झाला होता. वाद मिटविण्यासाठी तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील (85) यांच्यासह गावातील प्रमुखांनी एक जुलैला गावात बैठक बोलावली होती. बैठकीत वाद टोकाला जाऊन दोन्ही गटांत धुमश्‍चक्री उडाली. बंदुका, रिव्हॉल्व्हरने झालेल्या गोळीबारात रवींद्र डोंगळे व प्रकाश पाटील-कोतेकर गंभीर जखमी झाले. दोघांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तलवारी, लोखंडी पाईप, हॉकी स्टिक याच्या सहाय्याने झालेल्या हाणामारीत राजेंद्र डोंगळे, भाऊसाहेब पाटील, संदीप पाटील, प्रमोद पाटील, कृष्णा पाटील, अभिजित कोतेकर, राजेंद्र पाटील, विजय पाटील, राजाराम पाटील यांच्यासह अकरा जण जखमी झाले होते.

गटारीच्या बांधकामावरून वाद

बेलवळे खुर्द गावात राजकीय पूर्ववैमनस्य आणि गटारीच्या बांधकामावरून वाद सुरू होता. सत्तारूढ आणि विरोधी गटांच्या कार्यकर्त्यांत याच कारणावरून भांडण होत होते. वाद मिटविण्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी प्रयत्न करीत होते. दोन्ही गटांच्या सत्ता आलटून- पालटून आल्याने गटारीसह इतर कारणांवरून वाद सुरूच होते.

अंगावर काटा आणणारे दृश्य

एक जुलै 2012 रोजी वाद सुरू असतानाच आनंदा पाटील याने बंदुकीतून रवींद्र डोंगळेवर गोळीबार केला. तर मारुती पाटील याने रिव्हॉल्व्हरने प्रकाश पाटीलवर गोळीबार केला. रवींद्रच्या तोंडातून गोळी आरपार गेल्याने गंभीर जखमी झाला, तर प्रकाश पाटील - कोतेकर व भाऊसाहेब पाटील रक्‍ताच्या थारोळ्यात भर चौकात पडले होते.

उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

रवींद्र डोंगळे आणि प्रकाश पाटील - कोतेकर या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्रला सहा महिन्यांची मुलगी होती. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. तर प्रकाश पाटील - कोतेकर याचे लग्‍न ठरले होते; पण या घटनेने त्याचे विवाहाचे स्वप्न अधुरे राहिले.

गुरुवारी या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्यासमोर झाली. अतिरिक्‍त सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी 26 साक्षीदार तपासले. फिर्यादी दिनकर कोतेकर, जखमी कृष्णात पाटील, अभिजित कोतेकर, राजेंद्र पाटील, प्रकाश डोंगळे, संदीप पाटील, काडतुसे विक्रेता जैनुद्दीन शिकलगार, अशोक पाटील, डॉ. वीरेंद्रसिंह पोवार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

दंडाची रक्‍कम मृतांच्या नातेवाईकांना

आरोपी आनंदा पाटील व मारुती पाटील या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही रक्‍कम मृत रवींद्र डोंगळे व प्रकाश पाटील - कोतेकर यांच्या नातेवाईकांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तिसरा आरोपी प्रकाश पाटील यालाही दोषी ठरवले; पण तो शिक्षण घेत असल्याने तीन वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या बाँडवर त्याला सोडण्यात आले. दरम्यान, निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती.