Mon, Jun 17, 2019 03:08होमपेज › Kolhapur › मुख्याध्यापक, शिक्षकांना दिलेल्या नोटिसा मागे

मुख्याध्यापक, शिक्षकांना दिलेल्या नोटिसा मागे

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 16 2018 12:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने घेतलेल्या परिपाठ आंदोलनात सहभागी संस्थाचालक, मुख्याध्यापकांना नोटिसा पाठवून गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात कृती समिती पदाधिकार्‍यांनी गुरुवारी शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी,  प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना पोलिसांसमोर जाब विचारला. अखेर या नोटिसा मागे घेत असल्याची लेखी हमी शिक्षण अधिकार्‍यांनी दिल्यानंतर वातावरण निवळले.

सरकारी शाळा बंद व खासगी कंपनीस शाळा सुरू करण्यास परवनागी देण्याच्या धोरणाविरोधात मंगळवारी कृती समितीने सामुदायिक परिपाठ आंदोलन घेतले. याप्रकरणी शिक्षण विभाग, पोलिसांनी नोटिसा पाठवीत गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे संतप्त कृती समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन शिक्षण अधिकार्‍यांना जाब विचारला. 

याप्रसंगी कृती समिती पदाधिकारी व शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, कनिष्ठ प्रशासनधिकारी किरण शिरोळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, मनपा प्रशासनाधिकारी विश्‍वास सुतार यांची बैठक झाली. भरत रसाळे यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. कृती समिती समन्वयक अशोक पोवार म्हणाले, मुख्याध्यापक, शिक्षकांना नोटिसा पाठविण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला. रविवारी सुट्टी दिवशी नोटीस कशी काढली?, व्हॉटस् अ‍ॅपवरील नोटिशीला कायदेशीर मान्यता आहे का?, तुमचा बोलविता धनी कोण? अशी विचारणा केली. 

यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर मुलांची जबाबदारी शिक्षण विभागाची नसल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी चौगुले यांनी शिक्षण विभागाच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर परिपत्रक पाठविले होते, ही नोटीस नसल्याचे सांगितले. यावेळी सुभाष देसाई, गिरीश फोंडे, लाला गायकवाड, वसंतराव मुळीक यांनी नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. प्रशासनाधिकारी सुतार यांनी शहरातील शाळांना नोटिसा पाठविल्या नसल्याचे सांगितले. नोटिसा मागे घेण्याचे लेखी देण्याचे जाहीर केल्याने वादावर पडदा पडला. यावेळी गणी आजरेकर, रमेश मोरे आदी उपस्थित होते.