Thu, Aug 22, 2019 11:19होमपेज › Kolhapur › शेतीमालाचे व्यवहार ऑनलाईन न करणार्‍या बाजार समितींवर कारवाई

शेतीमालाचे व्यवहार ऑनलाईन न करणार्‍या बाजार समितींवर कारवाई

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:18AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

केंद्र सरकारतर्फे सुरू केलेल्या ई-नाम योजनेला शेतकरी, व्यापारी यांच्याकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन पणन मंडळाने बाजार समित्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. यापुढे शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्व ऑनलाईन करा, मालाचे पेमेंटही ऑनलाईन पद्धतीने द्या, अशी ताकीद दिली आहे. जी बाजार समिती पणन मंडळाच्या आदेशानुसार कामकाज करणार नाही, अशा बाजार समितींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंडळाने बाजार समितींना दिला आहे. तशा आशयाच्या नोटिसाही बाजार समित्यांना पाठविल्या आहेत. 

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला दर मिळावा, शेतीमालाचे पैसे पूर्णपणे शेतकर्‍याच्या हातात पडावेत, त्यात शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, ऑनलाईन सौदे काढताना व्यापार्‍यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये राज्यातील 30 मार्केट कमिट्यांचा समावेश आहे. या बाजार समितीच्या आवारात सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक बाजार समितीला 30 लाखांचा निधी देण्यात आला आहे. 

कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीत ई-नामचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यावर टोमॅटो, कोबी, फ्लॉवर या तीन भाज्यांच्या ऑनलाईन सौद्यासाठी तीन महिन्यांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ऑनलाईन सौद्यासाठी गेल्या तीन महिन्यांत कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी या भागातील व्यापार्‍यांव्यतिरिक्‍त इतरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. देशातील इतर राज्यातील ई-नाम योजनेची तीच परिस्थिती आहे.

ही बाब लक्षात घेऊन पणन मंडळाने शेतकरी, अडते, व्यापारी यांची नोंदणी ई-पोर्टलवर करणे बंधनकारक बंधनकारक केले आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना शेतकरी, व्यापारी यांना येणार्‍या अडचणी, सौद्याच्यावेळच्या तांत्रिक अडचणीत, या बाबी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे.