Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Kolhapur › सावधान, पुढे धोका आहेच!

सावधान, पुढे धोका आहेच!

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्वत:च्या सोयीनुसार अस्ताव्यस्त लावलेली वाहने... बेदरकार अन् बेशिस्त वाहनधारक...अपवाद वगळता सूचना फलकांचा अभाव... यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महापालिका प्रशासन, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि वाहनधारक यांच्या समन्वयातूनच शहरातील वाहतूक सुसह्य होऊ शकते; पण या तिन्ही घटकांतील समन्वयाचा अभाव शहराला बेशिस्त वाहतूक व्यवस्थेकडे ढकलत आहे.

...येथे दररोजच असते ट्रॅफिक जाम

राजारामपुरी जनता बझार चौक, परीख पूल, गोकुळ हॉटेल चौक, शाहूपुरी व्यापारी पेठ, उमा टॉकिज ते फोर्ड कॉर्नर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ मेन रोड या ठिकाणी वाहनधारकांना दररोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागते.  या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत कशी होईल, यावर भर देण्याची आवश्यकता आहे; पण आतापर्यंत तरी तसे ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.  

काही व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण!

रस्त्यालगत व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यावसायिक रस्त्यातच लोखंडी ग्रील टाकून पार्किंग समस्येत भर घालताना दिसतात. शहरात काही मार्गांवर सम-विषम तारखेचे पार्किंग असतानाही व्यावसायिक लोखंडी ग्रील टाकून वाहनधारकांची पार्किंगसाठी अडवणूक करताना दिसतात. प्रत्येकाचा व्यवसाय झाला पाहिजे, यात दुमत असायचे कारण नाही; पण त्यासाठी वाहतुकीत व्यत्यय येऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

पार्किंगची ठिकाणे वाढविण्याची गरज

महापालिकेतर्फे शहरात बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर परिसर, ताराबाई रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर अशा काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे; पण वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता, हे पार्किंग पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहने लावायची कुठे? असा प्रश्‍न वाहनधारकांना सतावतो. परगावच्या वाहनधारकांना तर वाहनांसाठी पार्किंगची जागा मिळवणे म्हणजे दिव्य पार पाडण्यासारखी स्थिती बनली आहे. पार्किंगसाठी त्यांना अनेकदा कसरत करावी लागते. 

दिशादर्शक, पार्किंग-नो पार्किंग फलक नसल्याने गोंधळात भर

शहरातील काही मार्गांचा अपवाद वगळला, तर दिशादर्शक, पार्किंग, नो पार्किंग, वन-वे, सम-विषम तारखेचे फलक शोधूनही सापडत नाही. अशा स्थितीत वाहनधारकांना केवळ अंदाजाने वाहने चालवावी लागतात. त्यातून कधी-कधी नियम मोडला म्हणून वाहतूक पोलिसांकडून दंडही वसूल केला जातो. दिशादर्शक फलकांचा अभाव हेदेखील शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडण्याचे प्रमुख कारण आहे.

नियम तोडणार्‍यांवर कडक कारवाईची गरज

सिग्‍नल तोडण्याची काही वाहनधारकांना उपजतच सवय लागल्याचे पाहायला मिळते. शहरातील प्रमुख सिग्‍नलवर हे चित्र सर्रास पाहायला मिळते. अशा बेदरकार वाहनधारकांवर सातत्याने कारवाई झाल्यास सिग्‍नल तोडण्याचे प्रमाण काहीअंशी कमी होऊ शकते. वाहनधारकांनीही स्वत: वाहतुकीचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे. केवळ कायद्याचा धाक दाखवून वाहतुकीला शिस्त लागणार नाही, तर वाहनधारकांनी स्वत:ही वाहतुकीची शिस्त अंगी बाणवण्याची गरज आहे.

पादचार्‍यांना तर शहरात रस्ताच नाही!

शहरात नाही म्हणायला पादचार्‍यांसाठी फुटपाथ केले आहेत; पण त्या फुटपाथवरही छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचार्‍यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. कारण, कुठला वाहनधारक कधी येऊन धडक देईल, याची शाश्‍वती राहिलेली नाही. रस्ता ओलांडण्यासाठी सिग्‍नल असणार्‍या चौकात झेब्रा क्रॉसिंग आहेत; पण काही वाहनधारक त्याच्यावरच वाहने उभी करतात. अशावेळी रस्ता कसा ओलांडायचा? असा प्रश्‍न पादचार्‍यांना पडतो. त्यांचा विचार कोण करणार का?