Fri, Apr 26, 2019 10:08होमपेज › Kolhapur › बॉक्साईटची प्रतवारी, रॉयल्टीची मोजदाद आवश्यक!

बॉक्साईटची प्रतवारी, रॉयल्टीची मोजदाद आवश्यक!

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:11AMकोल्हापूर : सुनील कदम

बॉक्साईटच्या प्रतवारीनुसार त्याच्या शासकीय रॉयल्टीचे प्रमाण ठरते. मात्र, हिंडाल्को कंपनी उत्खनन आणि वाहतूक करीत असलेल्या बॉक्साईटची प्रतवारी आणि त्यासाठी निश्‍चित करण्यात आलेले रॉयल्टीचे प्रमाण संशयास्पद असल्याचा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे येथील बॉक्साईटची प्रतवारी आणि रॉयल्टी यांची प्रमाणकनिहाय मोजदाद करण्याची आवश्यकता आहे. ती झाल्यास यातील कोट्यवधी रुपयांची सौदेबाजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साधारणत: नैसर्गिकरीत्या सापडणारे बॉक्साईट हे प्रामुख्याने तीन प्रकारचे असते. हलके, मध्यम आणि उच्च प्रतीचे, अशा तीन वर्गात त्याची प्रतवारी केली जाते. हलक्या प्रतीचे बॉक्साईट हे प्रामुख्याने सिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येते. मध्यम प्रतीच्या बॉक्साईटपासून अ‍ॅल्युमिनियमसारखे धातू बनविण्यात येतात. उच्च प्रतीच्या बॉक्साईटपासून प्रामुख्याने तांबे हा धातू तयार होतो. सध्याच्या प्रचलीत बाजारभावानुसार हलक्या प्रतीच्या बॉक्साईटचा दर हा प्रतिटन 700 ते 800 रुपयांच्या आसपास आहे. मध्यम प्रतीचे बॉक्साईट प्रतिटन 1500 ते 3500 रुपयांच्या आसपास आहे, तर उच्च प्रतीच्या बॉक्साईटचा बाजारभाव प्रतिटन 6000 ते 7000 रुपयांच्या आसपास आहे. बॉक्साईटच्या प्रतवारीनुसार आणि प्रचलीत बाजारभावानुसार शासकीय रॉयल्टीचे दर निश्‍चित केले जातात. बॉक्साईटचा दर्जा आणि बाजारात त्याची जी किंमत असेल त्याच्या एक चतुर्थांश रक्कम ही शासनाकडे रॉयल्टी म्हणून भरावी लागते. शासनामार्फत राधानगरी अभयारण्यातील बॉक्साईट पाटी हिंडाल्को कंपनीकडून सध्या प्रतिटन 182 रुपये इतकी रॉयल्टी आकारण्यात येत आहे. याचा अर्थ हे बॉक्साईट हलक्या प्रतीचे दाखविण्यात आलेले असावे.

महत्त्वाची बाब म्हणजे राधानगरी अभयारण्यात सापडणार्‍या या बॉक्साईटचा दर्जा हलका असल्याचे कुणी आणि कसे ठरवले? या क्षेत्रातील काही जाणकारांच्या मतानुसार सह्याद्रीच्या पठारावर सापडणारे बॉक्साईट हे देशातील अन्य बॉक्साईटच्या तुलनेत उच्च दर्जाचे आहे. तसे असेल तर मग या घोटाळ्याची व्याप्ती आणखीनच वाढते. शासकीय अधिकार्‍यांनी या बाबतीत स्वत:सह कंपनीच्या भल्यासाठी आपापली  डोकी चालवल्यामुळे आज शासनाला नाममात्र रॉयल्टीवर समाधान मानावे लागत असल्याचा संशय त्यामुळेच बळावत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार खरोखरच हे बॉक्साईट उच्च दर्जाचे असेल तर शासकीय आकडेवारीनुसार हिंडाल्को कंपनीकडून एक वर्षात उत्खनन होणार्‍या या बॉक्साईटची किंमत जवळपास 500 ते 600 कोटी रुपये तर शासनाची रॉयल्टी होते जवळपास 125 ते 150 कोटी रुपये. त्यामुळे कुठे हिंडाल्कोकडून आज मिळणारी नाममात्र रॉयल्टी आणि कुठे हे 500 ते 600 कोटी रुपये, अशी शंका येणे रास्त आहे. त्यामुळेच याच्या सखोल चौकशीची गरज आहे.

हिंडाल्कोचा बॉक्साईट वापर काय दर्शवतो?
हिंडाल्को कंपनी राधानगरी अभयारण्यातून नेत असलेल्या बॉक्साईटचा वापर आपल्या बेळगाव येथील युनिटमध्ये करते. कंपनीच्या या युनिटमध्ये प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्याचा वापर होतो. हे अ‍ॅल्युमिनियम आणि तांबे येथीलच बॉक्साईटपासून तयार होत असेल तर येथील बॉक्साईट मध्यम किंवा उच्च प्रतीचे असले पाहिजे. प्रत्यक्षात कंपनी ते हलक्या प्रतीचे असल्याचे दर्शवून शासनाची करोडो रुपयांची फसवणूक करीत आहे, असे प्रत्यक्षदर्शी दिसते.