होमपेज › Kolhapur › पर्यावरणवादी घेणार न्यायालयात धाव!

पर्यावरणवादी घेणार न्यायालयात धाव!

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:58AMकोल्हापूर : सुनील कदम

हिंडाल्को कंपनीकडून राधानगरी अभयारण्य परिसरात करण्यात येत असलेल्या बॉक्साईट उत्खननाची राज्यातील काही पर्यावरणवादी संघटना, संस्था आणि व्यक्‍तींनी गंभीर दखल घेतली असून या खोदाईविरुद्ध संबंधितांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी सुरू असलेली बॉक्साईट खोदाई बंद करण्याचा संबंधित संघटनांचा निर्धार दिसून येत आहे.

शासनाने अभयारण्याच्या परिसरातील दुर्गमानवाड भागात हिंडाल्को कंपनीला बॉक्साईट खोदाईचा परवाना दिलेला आहे. कंपनीकडून या भागातून दररोज दीड ते दोन हजार टन बॉक्साईटची वाहतूक सुरू आहे. या बॉक्साईटच्या उत्खननासाठी कंपनी अजस्र यंत्रांच्या साहाय्याने या भागातील डोंगरच्या डोंगर भुईसपाट करताना दिसत आहे. कंपनीच्या या कामामुळे अभयारण्यातील अत्यंत दुर्मीळ असलेली वनसंपदा धारातीर्थी पडताना दिसत आहे. त्याचप्रमाणे या खोदाईमुळे अभयारण्य परिसरातील अनेक वन्य पशुपक्ष्यांनी या भागातून पोबारा केल्याचे आढळून येत आहे. राधानगरी अभयारण्य परिसरात हिंडाल्को कंपनीने सुरू केलेल्या बॉक्साईट खोदाईविरुद्ध आता केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे, तर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यातील पर्यावरणवादी संघटनांनी तर या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, आपापल्या पातळीवर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे या संघटनांच्या काही तज्ज्ञ लोकांनी या परिसराची पाहणी आणि अभ्यास सुरू केल्याचे आढळून येत आहे. 

हिंडाल्को कंपनीने सुरू केलेल्या या बॉक्साईट खोदाईमुळे अभयारण्यातील पर्यावरण आणि अभयारण्याचे एकूण अस्तित्वच धोक्यात येण्याचा धोका स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे राज्यातील काही पर्यावरणवादी संस्थांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले गेले आहे. कायद्यानुसार अभयारण्यापासून पंचवीस किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पाला परवानगी देता येत नसताना शासनाने या बॉक्साईट खोदाईला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्‍न आता पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या ठिकाणी बॉक्साईट खोदाईला परवानगी देताना केंद्रीय वन खाते, पर्यावरण खाते व अन्य संबंधितांची दिशाभूल केली असावी, असा संशय व्यक्‍त करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळेच राज्यातील काही पर्यावरणवादी संघटनांनी आता या प्रकरणाच्या मुळापासून चौकशीला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन झाले. त्या ठिकाणी पर्यावरणाची कशा प्रकारे वाताहत झाली, याची माहिती संकलित केली जाऊ लागली आहे. त्या माहितीच्या आधारे राधानगरीतील या बॉक्साईट खोदाईला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.