होमपेज › Kolhapur › लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची होणार तपासणी

लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची होणार तपासणी

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 12:27AMकोल्हापूर : अनिल देशमुख

विविध निराधार योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली जाणार आहे. एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांची बँकेत जाऊन तपासणी होणार आहे. गुरुवारी जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम राबविली जाणार आहे.

जिल्ह्यात विविध योजनांचे 94 हजार लाभार्थी आहेत. त्यांना दर महिन्याला सुमारे 22 ते 23 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी विविध निकष आहेत, त्यानुसार अनेकदा लाभार्थ्यांची संख्या वाढते तर कधी कमी होत असते. काही ठिकाणी निकषात न बसणार्‍यांनाही लाभार्थी ठरवून अनुदान लाटण्याचा प्रकार होत असतो. काही वर्षांपूर्वी  बोगस लाभार्थ्यांना प्रशासनाने दणका दिला होता.
लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान बँका संबंधिताला वेळेत देतात की नाहीत, लाभार्थी खात्यावरील अनुदान कशा प्रकारे काढतो,  रक्‍कम काढताना काही अचडण येते का?  रक्‍कम परस्पर कोणी काढून नेते का? आदी बाबींच्या अनुषंगाने  बँक खात्यांची चौकशी होणार आहे.

जिल्ह्यात एकाच दिवशी  गुरुवारी (दि.30) ही मोहीम राबविली जाणार आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्‍कम काढताना येणार्‍या अडी-अडचणींबाबतची माहिती मिळू शकेल, यासह काही बोगस लाभार्थीही आढळून येतील, असा प्रशासनाला विश्‍वास आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांतील लाभार्थ्यांची शोधमोहीम राबविली आहे. त्याची माहिती आणि बँक खात्यांच्या तपासणीनंतर उपलब्ध होणार्‍या माहितीच्या आधारे समोर काही चित्र येईल, त्याचा योग्य लाभार्थ्यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी फायदा होईल, तसेच बोगस लाभार्थीही समोर येऊ शकतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.