Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Kolhapur › बँक खाते हॅक; सव्वा कोटी हडप : चौघा जणांना अटक

बँक खाते हॅक; सव्वा कोटी हडप : चौघा जणांना अटक

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:54AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

युनिक ऑटोमोबाईल्सचे बँक खाते हॅक करून सव्वा कोटींच्या रकमेवर डल्‍ला मारण्यामागे नायजेरियन टोळी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एका महिलेसह चार परप्रांतीयांना अटक केली.

राजीव रंजन कुमार (वय 32, रा. पाटणा, बिहार), विकास साव ऊर्फ विकास कालू (34, रा. पश्‍चिम बंगाल), मातादिनसिंग सिकरवार ऊर्फ रामबीरसिंग परमार (32, रा. धौलपूर, राजस्थान) यांच्यासह केहकश परविन (31, रा. पाटणा) या महिलेला अटक केली. मास्टरमाईंड व नायजेरियन टोळीचा भारतातील हस्तक पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

युनिक ऑटोमोबाईल्स प्रा. लि. कंपनीच्या खात्यातील 1 कोटी 24 लाख 60 हजार रुपये इतकी रक्‍कम ऑनलाईन बँकिंगद्वारे हडपल्याचा प्रकार 20 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला होता. हॅकर्सने कंपनीत वापरल्या जाणार्‍या सिमकार्डचा गैरवापर करून बँकेकडील युजर आयडी व पासवर्ड मिळवला होता. हॅकर्सनी ही रक्‍कम मुंबई, दिल्‍ली, गुवाहाटी, जमशेदपूर, पश्‍चिम बंगालमधील खात्यांवर वर्ग केली होती. शाहूपुरी पोलिसांनी झारखंडमध्ये मिळालेल्या महिलेच्या खात्यावरील रकमेबाबत चौकशी करून तिला ताब्यात घेतले. या चौघांनाही खात्यात जमा झालेल्या रकमेतील 20 टक्के रक्‍कम मिळाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 

जमशेदपूर व नाशिकमध्येही ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला. यामागेही नायजेरियन हॅकरचा हात असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. बँक खात्यांची माहिती मिळाल्यानंतर रक्‍कम काढण्यापूर्वी पोलिसांनी काही खाती बंद केली. यामुळे 35 लाख रुपये वाचविण्यात यश आले.