Tue, Jul 23, 2019 07:17होमपेज › Kolhapur › राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरावर बंदी

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरावर बंदी

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्र दिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून कागद व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्ततः पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यासारखाच करावा. 

राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम 2 नुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करून सुभेदार म्हणाले, काही वेळा समारंभात वैयक्तिक वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतस्ततः रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी आढळतात. राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात. हे दृश्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर एक तर त्याचा योग्य मान राहील याप्रमाणे ठेवण्यात यावेत.