Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Kolhapur › मागासवर्ग प्रभागांना मिळणार सव्वातीन कोटी निधी

मागासवर्ग प्रभागांना मिळणार सव्वातीन कोटी निधी

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 25 2018 11:15PMकोल्हापूर : प्रतिनिधी  

महापालिका प्रशासनाने कात्री लावलेल्या मागासवर्ग प्रभागांचा निधी अखेर त्या प्रभागांना मिळणार आहे. महापालिका बजेटमधून प्रत्येकी 30 लाख याप्रमाणे 3 कोटी 30 लाखांचा निधी 11 प्रभागांना देण्यात येणार आहे. त्यानुसार विकासकामांचे एस्टिमेंट करून द्यावे, असे प्रशासनाने संबंधित नगरसेवकांना कळविले आहे. आता या प्रभागांत महापालिका बजेटमधून रस्ते, गटार, काँक्रीट पॅसेज, सांस्कृतिक हॉल, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन आदी विकासकामे केली जाणार आहेत. 

महापालिकेच्या महसुली उत्पन्‍नापैकी बांधीव खर्च वजा जाता राहिलेल्या रकमेच्या पाच टक्के निधी मागासवर्ग प्रभागातील विकासकामांसाठी खर्च करावा, असा नियम आहे. गेल्यावर्षी महापालिका प्रशासनाने तीन कोटींची तरतूद केली होती. परंतु, प्रत्यक्षात दीड कोटी खर्ची पडले. यंदा मागील वर्षाचे दीड कोटी आणि चालू आर्थिक वर्षातील तीन कोटी असे साडेचार कोटी रुपये देणे आवश्यक होते. परंतु, प्रत्यक्षात 50 लाखांचा निधी दिला होता. शुगर मिल, कदमवाडी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, संभाजीनगर, नेहरूनगर, जवाहरनगर, कळंबा फिल्टर हाऊस, फुलेवाडी-रिंगरोड, कनेरकरनगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर-जीवबा नाना पार्क आदी प्रभागांचा समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बजेटमधील ठराविक रक्‍कम मागासवर्ग प्रभागांच्या विकासासाठी राखून ठेवावी, असा नियम आहे. त्यांतर्गत कोल्हापूर महापालिकेच्या बजेटमध्ये सुमारे तीन कोटींची तरतूद केली जाते. परंतु, यंदा तो निधी अत्यंत कमी दिला जाणार होता. 11 प्रभागांसाठी केवळ 50 लाखांची तरतूद केली होती. दैनिक ‘पुढारी’मधून 20 जुलैला ‘मागासवर्ग प्रभागांच्या निधीला कात्री,’ असे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. महासभेत नगरसेवक भूपाल शेटे, सौ. कविता माने, अभिजित चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर प्रशासनाने मागासवर्ग प्रभागांच्या राखीव निधी त्या-त्या प्रभागांना देण्याचा निर्णय घेतला.