Tue, Apr 23, 2019 09:56होमपेज › Kolhapur › खरिपातील पीक कर्जवाटपात राष्ट्रीय बँका पिछाडीवर

खरिपातील पीक कर्जवाटपात राष्ट्रीय बँका पिछाडीवर

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:30AMआजरा : सचिन कळेकर

खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी शेतकरीवर्ग शेतीची कामे सोडून पीक कर्जासाठी बँकांमध्ये फेर्‍या घालत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँकांना 1,390 कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1,050 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप केले असून, यामध्ये जिल्हा बँकेचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी 40 टक्के कर्जवाटप झाले आहे. यावरून खरीप हंगामाकरिता वाटप केल्या जाणार्‍या कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होते.

जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून खरीप हंगामाकरिता पीक कर्जवाटप सरू आहे. जिल्हा बँकेने 730 कोटी 20 लाख रु. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, 17 टक्के जादा म्हणजेच 851 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेकडून वाटप केलेल्या पीक कर्जाचा जिल्ह्यातील 91 हजार 418 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.

तर जिल्ह्यातील 21 राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत 448 कोटी 91 लाख रु. पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टापैकी 160 कोटी 56 लाख रु. पीक कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून झालेली कर्ज वाटपाची रक्‍कम पाहता जिल्हा बँकेच्या तुलनेत हे पीक कर्जवाटपाचे प्रमाण कमी दिसते. जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना व शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा घोळ संपला नसल्याने खरीप हंगामाकरिता बी-बियाणे, खते खरेदी करण्याकरिता शेतकर्‍यांकडे पैशांची चणचण होती. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने सर्व बँकांना एप्रिल महिन्यापासूनच पीक कर्जवाटपाचे निर्देश दिले होते. मात्र, आजही शेतकरीवर्ग पीक कर्जासाठी बँकांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसते.

शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून अनेक   शेतकरी वंचित असून, आजही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा शेतकर्‍यांना तर पीक कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चालू खरीप हंगामात जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्जवाटपात फारच पिछाडीवर असल्याच्या दिसतात.

राष्ट्रीयीकृत बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया किचकट आहे. या बँका विविध कागदपत्रांची मागणी करत असल्याने शेतकरीवर्ग या कागदपत्रांची जुळवाजुळव करत राहतो. त्यामध्येही शेतकर्‍यांचा काही वेळ जातो. परिणामी, शेतीची कामे सोडून बँकांमध्ये फेर्‍या माराव्या लागत आहेत. तसेच कागदपत्रांची पूर्तता करूनही वेळेत कर्ज मिळेल की नाही याची खात्रीही नाही, असे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

आजरा तालुक्यात 52 कोटी 97 लाख रु. पीक कर्जाचे वाटप

जिल्हा बँकेकडे आजरा तालुक्यासाठी 64 कोटी 79 लाख रु. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले असून, त्यापैकी 30 जूनअखेर बँकेने 52 कोटी 97 लाख रु. पीक कर्जाचे वाटप केले आहे. सध्याही पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. जिल्हा बँकेच्या शाखांकडे शेतकर्‍यांकडून पीक कर्ज मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, ठेवी अत्यल्प आहेत त्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्ज उचलण्याबरोबरच ठेवीही वाढवाव्यात, असे आवाहन आजरा तालुका विभागीय अधिकारी एस. ए. चौगुले यांनी केले आहे. तर तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचा पीक कर्जवाटपाचा प्रतिसाद कमी असल्याचे शेतकरीवर्गाकडून समजते. परिणामी, पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना बँकांच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत.