Fri, May 24, 2019 06:31होमपेज › Kolhapur › ‘भाजपमुळे राजकारणावरचा विश्‍वास दृढ’

‘भाजपमुळे राजकारणावरचा विश्‍वास दृढ’

Published On: May 27 2018 1:10AM | Last Updated: May 27 2018 12:50AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय राजकारणाबाबत गैरविश्‍वास निर्माण झाला होता; पण केंद्रातील भाजप सरकारने गेल्या चार वर्षांत हा विश्‍वास दृढ केला असल्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे सांगितले. भाजप सरकारने केंद्रातील चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकारच्या कामगिरीवर सामान्य माणूस समाधानी असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांना बँक माहिती नव्हती त्यांच्या दारात बँक पोहोचविली. 31 कोटी 52 लाख जनधन खात्यांद्वारे सर्वसामान्यांचा बँक व्यवहार वाढला आहे. जगभरात 2014 ते 17 या कालावधीत उघडलेल्या बँक खात्यांशी तुलना करता एकट्या भारतात 55 टक्के नवीन बँक खाती सुरू झाली. पोस्टालाही बँकेचा दर्जा प्राप्त करून दिला. 365 रुपयांत सर्वसामान्यांना विमा कवच दिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल पेन्शन योजना सुरू केली. पाच कोटी महिलांच्या घरी गॅस कनेक्शन पोहोचविले. गरोदर महिलांच्या औषधासह आहाराची सोय केली. 

स्वच्छता आणि हागणदारीमुक्त भारतासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तीन लाख 60 हजार गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. गरिबांना दोन रुपये प्रतिकिलो दराने धान्य, पीक विमा योजना, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न, 22 पिकांना हमीभाव आणि चार वर्षांत दोनदा उसाच्या एफआरपीमध्ये वाढ असे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून 22 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाले आहेत. त्यांचे मेळावे आयोजित करून सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारचा कारभार एकदम स्वच्छ आहे. महाराष्ट्रातील काही मंत्र्यांवर गैरव्यवहारांचे आरोप झाले; पण चौकशीअंती त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सरकारने पारदर्शीपणे सर्वसामान्यांसह देश आणि राज्याच्या विकासाला अधिक महत्त्व दिले आहे, असे ना. पाटील यांनी सांगितले.