Fri, Apr 26, 2019 17:36होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : राष्ट्रवादीचे आंदोलन ‘बालिशबहू’

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे आंदोलन ‘बालिशबहू’

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:47AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत मिळालेल्या पुरस्काराबाबत केलेले आंदोलन म्हणजे बालिशबहू या पठडीतील असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

बद्धकोष्ठ झालेल्या एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्र्यांचा पेहराव करून बालिशपणाचा कळस या आंदोलनाने गाठला. मुळातच सत्ता गेल्याने व पुन्हा ती मिळणारच नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने भयकंपित झालेल्या या राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची बाळबोध आंदोलने सुरू असल्याची टीका या पत्रकात केली आहे. 

टोपीपासून ते पगडी, पागोट्यांचे राजकारण करणार्‍या या पक्षाचे आजचे आंदोलन म्हणजे सत्ताभ्रष्ट झालेल्या लोकांचे खचलेले मनोबल आणि राजकीय मतिमंदत्वच म्हटले पाहिजे. भाजपची गेल्या साडेतीन वर्षांची कामगिरी बघून जिल्ह्यातील नेत्यांचे पाय लटपटू लागले आहेत, त्यातून विचलित झालेल्या या नेत्यांकडून पालकमंत्र्यांवरसुद्धा विनाकारण टीका केली जात आहे. राष्ट्रवादीला सर्वच ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागत आहे, त्यातून आलेल्या नैराशेपोटी अशी उपहासात्मक आंदोलने करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोणताही ठोस कार्यक्रम नसलेल्या या पक्षाचे व त्यांच्या नेत्यांचे भान सुटले आहे, असा टोलाही या पत्रकात लगावला आहे.