Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Kolhapur › सत्ताधार्‍यांमध्ये राज्य चालविण्याची धमक नाही

सत्ताधार्‍यांमध्ये राज्य चालविण्याची धमक नाही

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:59PMकागल : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर कोणीही समाधानी नाही. राज्य कर्जबाजारी झाले आहे. राज्य चालविण्याची धमक राज्यकर्त्यांमध्ये राहिलेली नाही. सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय येत्या अधिवेशनामध्ये सभागृहच चालू दिले जाणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. 

गोरगरीब निराधारांचा अनुदान देण्यावरून छळ केला जात आहे. जिल्हा बँकेतून दिली जाणारी पेन्शन पुन्हा आयसीआयसीआय बँकेतून देण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथील कार्यक्रमात आ. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंत तोडकर होते. 

आ. मुश्रीफ म्हणाले, तालुक्यात गेल्या तीस -पस्तीस वर्षांपासून अनेक विकासकामे करण्यात आली. पिण्याच्या पाणी योजना, औद्योगिक क्षेत्र, गोरगरिबांवर मोफत उपचार करण्यात आले. साखर कारखाने, याबरोबर गावोगावचा विकास त्रिसूत्री पद्धतीने करण्यात आला. एकही काम शिल्‍लक ठेवले नाही. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला. हा विकास शाश्‍वत वाटत नाही काय? संजय गांधी योजनेच्या माध्यमातून अनेकांना पेन्शन सुरू केली. मात्र, श्रेय घेण्यावरून निराधारांचा सध्या छळ सुरू करण्यात आला आहे. हा छळ थांबविण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल. काहीजण गेल्या दोन वर्षात येऊन निवडणुकीच्या गप्पागोष्टी करीत आहेत.

 जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, प्रकाश गाडेकर, युवराज पाटील, कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे अध्यक्ष कृष्णात पाटील, पंचायत समितीचे उपसभापती रमेश तोडकर, जी. एस. संकपाळ, कु. श्रेया तोडकर यांची भाषणे झाली. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, अशोक नवाळे, नेताजी मोरे, शिवानंद माळी, विकास पाटील आदी उपस्थित होते. स्वागत सुनील कांबळे यांनी, तर प्रास्ताविक संदीप तोडकर यांनी केले. आभार तानाजी पाटील यांनी मानले.