Sun, Aug 25, 2019 03:45होमपेज › Kolhapur › पाटाकडील ‘ब’, खंडोबा तालीम मंडळाची आगेकूच

पाटाकडील ‘ब’, खंडोबा तालीम मंडळाची आगेकूच

Published On: Jan 18 2018 1:44AM | Last Updated: Jan 18 2018 1:21AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

प्रॅक्टिस क्लब ‘ब’ संघाचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करून पाटाकडील ‘ब’ संघाने तर, संध्यामठ तरुण मंडळावर 5-3  अशी मात करून खंडोबा तालीमने ‘केएसए लिग’ फुटबॉल स्पर्धेत आघाडी मिळविली.

पीटीएमचा तीन गोल्सने विजय... 
कोल्हापूर स्पोर्टस् असो. आयोजित ‘केएसए’ लिग फुटबॉल स्पर्धेतील बुधवारी दुपारच्या सत्रातील पहिला सामना पीटीएम ‘ब’ विरुद्ध प्रॅक्टिस ‘ब’ यांच्यात झाला. संपूर्ण सामन्यावर पीटीएमचे वर्चस्व होते. रोहन कांबळे, पवन सरनाईक, शुभम चव्हाण, आकाश काटे, प्रथमेश दरेकर यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. 37 व्या मिनिटाला रोहित पोवारने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात त्यांच्या शुभम चव्हाण याने 67 व्या मिनिटाला गोल केला. पाठोपाठ 74 व्या मिनिटाला प्रथमेश दरेकरने गोल नोंदवत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिसकडून शुभम मस्कर, जॉन्सन, रोहित भोसले, श्‍लोक साठम, किरणकुमार चव्हाण यांनी गोल फेडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, अखेरपर्यंत त्यांना एकाही गोलची परतफेड करता आली नाही. 

खंडोबाची संध्यामठवर मात...
सायंकाळच्या सत्रातील सामन्यात संध्यामठने खंडोबाला अटीतटीची झुंज दिली. संध्यामठकडून 13 व्या मिनिटाला सौरभ हारुगले याने केलेल्या गोलची परतफेड खंडोबाकडून अजीज मोमीन याने 17 व्या मिनिटाला केली. यानंतर खंडोबाच्या अर्जुन शेतगावकर यांने 23 आणि 38 व्या मिनिटाना सलग दोन गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात 48 व्या मिनिटाला खंडोबाकडून झालेल्या चढाईत सुधीर कोटीकेलाच्या पासवर अजिज मोमीन याने वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथा गोल केला. संध्यामठकडून गोल फेडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अजिंक्य गुजर, शाहू भोईटे, सतीश अहिर, सौरभ हारुगले, मोहित मंडलिक यांनी लागोपाठ चढाया सुरूच ठेवल्या. 58 व्या मिनिटाला सतीश आहिर याने गोल नोंदविला. खंडोबाकडूनही चढाया सत्र सुरूच होते. 66 व्या मिनिटाला कपील शिंदेच्या पासवर अर्जुन शेतगावकर याने वैयक्तिक तिसरा, संघाकडून पाचवा गोल केला. संध्यामठकडून 77 व्या मिनिटाला आशिष पाटीलने गोल नोंदवत सामना 5-3 असा केला. 
आजचा सामना : बालगोपाल तालीम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ, सायंकाळी 4 वाजता.