Tue, Jul 23, 2019 11:11होमपेज › Kolhapur › बी.टेक.च्या पदवी प्रमाणपत्रात त्रुटींचा घोळ

बी.टेक.च्या पदवी प्रमाणपत्रात त्रुटींचा घोळ

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या बी. टेक. पदवीच्या अनेक प्रमाणपत्रांमध्ये नाव, पत्ता व अभ्यासक्रमांची नावे चुकीची पडली असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी याबाबत जाब विचारून संताप व्यक्‍त केला. त्रुटी असणारी प्रमाणपत्रे दुरुस्त करून तत्काळ बदलून दिली जातील, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, यापूर्वी दक्षता का घेतली नाही, असे खडसावत विद्यार्थ्यांनी नाराजीचा सूर कायम ठेवला. शिवाजी विद्यापीठात सोमवारी दीक्षांत समारंभ होता. यावेळी विविध स्टॉलवरून संबंधित अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात होते.

परीक्षा भवनच्या इमारतीच्या आवारातील स्टॉल क्रमांक 79 व 80 मध्ये बी.टेक पदवीच्या काही प्रमाणपत्रांमध्ये नाव, पत्ता तसेच अभ्यासक्रमांच्या नावात चूक असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार करून नाराजी व्यक्‍त करण्यास सुरुवात केली. तीनशे पदवी प्रमाणपत्रांपैकी जवळपास निम्म्या प्रमाणपत्रात त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांचा जमाव एकत्र जमून संताप व्यक्‍त करू लागला.

यामध्ये रत्नागिरी, नंदूरबार या परजिल्ह्यातून विद्यार्थी कुटुंबासहीत आले होते. पदवी न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे त्यांनी याचा जाब विचारण्यास सुरुवात केली.  प्रशासकीय अधिकर्‍यांनी गोंधळ वाढू नये याची दक्षता घेत हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्रुटी दुरुस्त करून तत्काळ प्रमाणपत्रे दिली जातील, असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.
 

tags : Kolhapur,news,B,Tech, Degree, Certificate, Mistake, Shivaji,University,