Sun, May 26, 2019 01:31होमपेज › Kolhapur › आजरा नगरपालिका : उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी जोरदार हालचाली

आजरा नगरपालिका : उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी जोरदार हालचाली

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:43PMआजरा : प्रतिनिधी

आजर्‍याच्या उपनगराध्यक्षपदाची निवड व स्वीकृत सदस्यांची निवड कार्यक्रम गुरुवारी (दि. 10) होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. उपनगराध्यक्षपदासाठी सत्तारूढ आघाडीकडून आलम नाईकवाडे व विलास नाईक हे दोनच पर्याय आहेत. तर स्वीकृत सदस्यपदासाठी सत्तारूढकडून विजयकुमार पाटील व आनंदा कुंभार, तर विरोधी आघाडीकडून अभिषेक शिंपी, शैलेश देशपांडे व रशीद पठाण यांची नावे पुढे येत आहेत. याबाबतच्या अटी विचारात घेता विजयकुमार पाटील व अ‍ॅड. शैलेश देशपांडे यांचे पारडे जड दिसत आहे.

स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी आजरा येथे राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना आघाडीची बैठक झाली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, संभाजी पाटील यांच्यासमोर स्वीकृत सदस्याकरिता चर्चा घडवून आणण्यात आली. स्वीकृतकरिता आवश्यक पात्रता विचारात घेऊनच याबाबतच्या हालचाली करण्याचे ठरले. याकरिता अ‍ॅड. शैलेश देशपांडे,रशिद पठाण व अभिषेक शिंपी यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. यापैकी एकास या पदावर संधी मिळणार आहे.

दरम्यान नेसरी येथे झालेल्या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष पदाकरिताचे नाव बंद पाकीटातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तारुढ आघाडीप्रमुखांकडे दिले आहे. याबाबतचा निर्णय झाला असून तो गुरुवारी औपचारिकरित्या जाहीर करण्यात येणार आहे. स्वीकृत सदस्याबाबतच्या अटी व शर्ती विचारात घेतल्यास अनेकांच्या दांड्या निवडीपूर्वीच उडाल्या असून ही मंडळी स्पर्धेतून बाहेर गेली आहेत. अटी-शर्तींचा विचार केल्यास सत्तारुढ आघाडीकडून विजयकुमार पाटील यांना तर विरोधी आघाडीकडून अ‍ॅड. शैलेश देशपांडे यांना संधी मिळणार असे दिसत आहे. 

एकंदर येत्या चार दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता असून उपनगराध्यक्षपदासह स्विकृत सदस्य निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहीले आहे. 

कारखाना शासननियुक्‍त संचालक पदासाठी हालचाली

दरम्यान, आजरा साखर कारखान्यामधील सत्तासंघर्ष गेल्या पंधरवड्यात उफाळून आला असून बलाबल टिकविण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून धडपड सुरु आहे. येत्या चार दिवसात साखर कारखान्यामध्ये शासननियुक्त संचालकाची नियुक्ती होणार असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.