Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Kolhapur › आजरा नगरपंचायत निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

आजरा नगरपंचायत निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 11 2018 11:52PMआजराः प्रतिनिधी

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आजरा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 12) सकाळी 10 वाजता नवीन प्रशासकीय इमारतीत होणार असून, या निकालानंतर अच्छे दिन कोणाला येणार? या प्रश्‍नाचे उत्तर संपूर्ण जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

नगराध्यक्षासह 17 नगरसेवकपदांच्या जागांकरिता मोठ्या चुरशीने निवडणूक पार पडली. भाजप व मित्रपक्षांची ताराराणी आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी व परिवर्तन विकास आघाडी अशा तीन आघाड्यांमध्ये कमालीच्या चुरशीने लढत झाली. तिन्ही आघाड्यांनी विजयाचा दावा केला आहे. चुरशीने 82.11 टक्के  मतदान झाले आहे. 18 जागांसाठी 73 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथम नगराध्यक्षपदाचा मान मिळविण्यासाठी तिन्ही आघाड्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचे खर्चाचे आकडे लाखोच्या घरात गेले आहेत. 

निवडणूक निकालाबाबत अनेकांनी पैजा लावल्या आहेत. जिल्ह्यातील बडी नेतेमंडळी मतदानासाठी घराघरांत फिरल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक निकालाबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, आज 12 वाजेपर्यंत सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, असे दिसत आहे. अनेक उमेदवारांनी मतदानाचा कल पाहून विजय आपलाच  असे गृहीत धरून जंगी मिरवणुकांची तयारी केली आहे.

Tags : Azara Nagar Panchayat, election, result