होमपेज › Kolhapur › आरक्षणासाठी ऑगस्ट क्रांतिदिनी महामार्ग रोखणार

आरक्षणासाठी ऑगस्ट क्रांतिदिनी महामार्ग रोखणार

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा  समाजाला आरक्षण मिळावे, शैक्षणिक व इतर सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांसाठी 1 जुलैपासून व्यापक लढा उभारण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक अहवाल शासनाला द्यावा यासाठी 9 जुलैला राज्य मागासवर्गीय आयोगासमोर रोक-ठोक आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्ट क्रांतिदिनी महामार्ग रोखला जाईल व यावेळी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला असेल, असा इशारा सुुरेश पाटील यांनी दिला. 

मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी  राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा क्रांती संघटनेची स्थापना केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या लोगोचे अनावरण झाले. 
सुरेश पाटील म्हणाले, ‘मराठा क्रांती संघटनेत राज्यातील 15 मराठा संघटना सहभागी झाल्या आहेत. यापुढे प्रत्येक जिल्हयात, तालुक्यात  मेळावे घेऊन पदाधिकारी निवड केली जाणार आहे. येत्या काही दिवसात या संघटनेत आणखी काही संघटनांचे विलीनीकरण होणार आहे. मराठा समाजातील 11 हजार युवकांना उद्योजक म्हणून उभे करण्याचा संघटनेचा मानस असून मराठा  आरक्षण, शिक्षण व संरक्षण यासाठी संघटना कार्यरत राहणार आहे.

संघटनेची राज्य कार्यकारीणी याप्रसंगी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या उपाध्यक्षपदी माजी पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रा. चंद्रकांत भराट (औरंगाबाद), सचिवपदी भरत पाटील (कोल्हापूर), कार्यकारीणी उपाध्यक्षपदी महादेव साळूंखे (सांगली), गोपाळ पाटील (खजिनदार),  कार्यकारीणी सदस्यपदी किशोर देसाई, विजय पाटील, चद्रकांत सावंत, सुनिता पाटील, राणी पाटील यांची निवड करण्यात आली. महादेव साळूंखे, विलास सावंत, किशोर देसाई यांनी मराठा समाजाची आर्थिक स्थिती खालावलेली असून,  आरक्षण देण्याची मागणी केली. याप्रसंगी फत्तेसिंह सावंत, प्रा मधुकर पाटील, राजू सावंत, भरत पाटील, बाबा महाडीक, विजय पाटील आदींची उपस्थिती होती.