Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › 9 ऑगस्टचा बंद शांततेने पाळावा; सकल मराठा समाजाचे आवाहन

9 ऑगस्टचा बंद शांततेने पाळावा; सकल मराठा समाजाचे आवाहन

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला पाठिंबा देत कोल्हापुरातील सकल मराठा क्रांती ठोक आंदोलनअंतर्गत सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनाचा भाग म्हणून क्रांतिदिनी (9 ऑगस्ट) भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या साक्षीने ऐतिहासिक दसरा चौकात ही सभा होणार आहे. गुरुवार, दि. 9 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ही सभा होणार असून, यावेळी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आणि बंद शांतता आणि संयमाने पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले. 

शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक व लष्करी अधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सभेची सुरुवात होईल. यानंतर राष्ट्रगीत होईल. शिवशाहिरांचे स्फूर्तिदायी पोवाडे, प्रेरणादायी गीतांच्या सादरीकरणानंतर राज्यभरातून आलेले अभ्यासक, तज्ज्ञ लोकांचे ‘मराठा आरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. 

सभेला येणार्‍या नागरिकांनी सोबत पाण्याची बाटली, जेवण, आवश्यक औषधे, रेनकोट-छत्री आदी गोष्टी घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले. आंदोलन मोडून काढण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बंदी आदेशाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मात्र, अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता ठरल्याप्रमाणे बंद आंदोलन यशस्वी करण्याबरोबरच दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

पत्रकार परिषदेस दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, जयेश कदम, प्रा. जयंत पाटील, अवधूत पाटील, फत्तेसिंह सावंत, राजू जाधव, विनायक फाळके, प्रसाद जाधव, गणी आजरेकर, अमित आडसूळ आदी उपस्थित होते.