Thu, May 23, 2019 05:11होमपेज › Kolhapur › गैरव्यवहार करणार्‍यांकडून वसुली करावी

गैरव्यवहार करणार्‍यांकडून वसुली करावी

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:07PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ऑडिट रिपोर्टवरून महामंडळाचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. ज्या माजी संचालकांवर दहा लाख रुपयांच्या दंडाची रक्कम भरण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यातील काही माजी संचालकांनी ज्यांनी गैरव्यवहार केला, त्यांच्याकडून तो वसूल करावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम वसूल होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

महामंडळाच्या 2010 ते 2015 सालच्या ऑडिट रिपोर्टमध्ये केलेल्या खर्चापैकी काही  व्यवहारांची उपलब्ध नसलेली  माहिती यामुळे 10 लाख 78 हजार 593 रुपयांच्या खर्चाला संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संबंधित माजी संचालकांनी सात दिवसांच्या आत ही रक्कम महामंडळात जमा  करावी, असे आदेश दिले आहेत. महामंडळानेही संबंधितांनी याबाबत नोटिशीद्वारे कळवले आहे. यासंदर्भात काही माजी संचालकांची बैठक झाली. झालेल्या खर्चाची जबाबदारी नेमकी कोणी घ्यावी, याबाबत खूप चर्चा झाली. महामंडळाचे विश्‍वस्त म्हणून काम करताना दैनंदिन होणार्‍या खर्चाचा तपशील ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

त्यांनी या खर्चाचा तपशील योग्य वेळी ठेवला असता, तर ही वेळ आली नसती.  वैयक्तिक संचालकांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असे फारसे कोठे अढळत नसल्याचे काहींनी सांगितले. अन्यत्र केलेल्या खर्चाला संपूर्ण संचालक मंडळाला जबाबदार न धरता ज्याच्या त्याच्याकडून तो वसूल करावा, असेही काहींचे मत आहे.  तर काही संचालकांनी यातून मार्ग काढण्यासाठी हालचाली करणे गरजेचे आहे, अशी भूमिका घेतली आहे. चित्रपट महामंडळातील कारभारावर विद्यमान संचालकांनी यापूर्वी टीका केली होती. चौकशीसाठी आंदोलन केले होते. यातूनच काही सभासदांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्यानंतर हा चौकशी अहवाल तयार करण्यात आला आहे.