Sat, Nov 17, 2018 20:37होमपेज › Kolhapur › भाषणबाजीने शेतकर्‍यांची चूल पेटत नाही : खुपसे

भाषणबाजीने शेतकर्‍यांची चूल पेटत नाही : खुपसे

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 10 2018 12:16AMहातकणंगले : प्रतिनिधी 

केवळ भाषणबाजी करून शेतकर्‍यांची चूल पेटत नाही. शेतकर्‍यांचे घर चालायचे असेल तर शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून मिरवणारे नेते नेहमीच मॅनेज होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी विश्‍वास तरी कोणावर ठेवायचा, असा सवाल सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांचे नाव न घेता प्रहार जनशक्‍ती पक्षाचे कोल्हापूर व सांगली संपर्क प्रमुख अतुल खुपसे-पाटील यांनी हातकणंगले येथील पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, जाती-पाती, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली केवळ समाजातील वंचित घटकांसाठी प्रहार जनशक्‍ती पक्षाचे काम सुरू आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तुलनेने पक्षाचे काम पोहोचायला विलंब झाला आहे.  हातकणंगले येथे रुग्ण कक्ष सुरू होणार असून, प्रत्येक गावात पक्षाचा रुग्णसेवक यासाठी कार्यरत असणार आहे. वंचितांना न्याय देण्यासाठी संघटना काम करेल, असा विश्‍वास अतुल पाटील यांनी व्यक्‍त केला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, दगडू माने, नियाज अहमद चौगुले, वैभव माने, राजेंद्र प्रधान, महादेव हिप्परकर आदी उपस्थित होते.