Thu, Apr 25, 2019 07:41होमपेज › Kolhapur › छत्रपती राजारामकालीन वास्तूंचे आकर्षण

छत्रपती राजारामकालीन वास्तूंचे आकर्षण

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, या ध्येयाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन रयतेच्या कल्याणासाठी खर्च केले. त्यांच्या या कार्याचा वारसा अखंड सुरू ठेवत स्पर्धेच्या युगात आवश्यक उपाययोजना राबविल्या. कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबरोबरच विविध प्रकारच्या प्रशासकीय वास्तू त्यांनी कोल्हापुरात उभारल्या. या वास्तूंच्या इतिहासाची माहिती कोल्हापूरकरांनी आवर्जून घेतली


छत्रपती राजाराम महाराज  यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणार्‍या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन श्री शिवाजी मराठा फौंडेशन तर्फे दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात करण्यात आले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (31 जुलै) या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. मंगळवारी सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनात छत्रपती राजाराम महाराज यांच्या बालपणीपासूनची दुर्मीळ छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. इ.स.वी. सन 1922 ला राज्यारोहण प्रसंगीचा जाहीरनामा, छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात उभारलेल्या विविध वास्तू, त्यांनी घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची कागदपत्रे, विविध योजना यासह सुमारे 90 दुर्मीळ छायाचित्रे, ऐेतिहासिक कागदपत्रे मांडण्यात आली आहेत. तसेच त्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या काठावरील शालिनी पॅलेसचे जतन-संवर्धन-संरक्षणासाठी राज्य शासनाने तातडीने प्रयत्न करावेत, या मागणीसाठी स्वाक्षर्‍यांची मोहीम सुरू राबविण्यात आली आहे. दरम्यान, प्रदर्शनास खा. संभाजीराजे, खा. राजू शेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन माहिती घेतली. संयोजन फौंडेशनचे इतिहास संशोधक राम यादव, अमित आडसुळे, रविराज कदम, नागराज सोळंकी, अश्‍विनी जाधव-कसबेकर, सुचित जाधव, किरण चाबुकस्वार, प्रशांत वरगे, भगवान चिले, पवन निपाणीकर, प्रदीप थोरवत, अतुल माने, संदीप जाधव आदींनी केले आहे.