Wed, May 22, 2019 10:42होमपेज › Kolhapur › सराईत गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

सराईत गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘मोक्‍का’अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी सराईत टोळीचा म्होरक्या गौरव अशोक भालकर (वय 26, सम्राटनगर) याने ‘कोम्बिंग ऑपरेशन’वेळी पथकाला चकवा देत फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत त्याचा साथीदार नितीन लोखंडे (25) हा पोलिसांच्या हाताला लागला. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आर. के. नगरातील भारतमाता कॉलनीत हा प्रकार घडला. 

राजारामपुरीचे प्रभारी अधिकारी शहाजी निकम व अन्य पोलिसांनी मारहाण करून बळजबरीने आपणाला फिनेल पाजले, असा गंभीर आरोप संशयित गौरव भालकर याने दवाखान्यात केला. आर. के. नगर परिसरात प्रकार घडल्याने करवीर पोलिसांनी याबाबत भालकरचा जबाब नोंदविला.

खंडणीसाठी भालकरसह टोळीची दहशत

भालकर व त्याच्या साथीदारांनी एक मे रोजी जयश्री संजय पाटील (तीनबत्ती चौक, दौलतनगर) यांच्या वडापाव विक्रीच्या गाडीवर दहशत माजवून 50 हजार रुपयांची मागणी केली होती. महिलेने पैसे देण्यास नकार देताच साथीदारांसमवेत भालकरने रिक्षासह तीन वाहनांची तोडफोड केली होती. कोयता, तलवारीने घरावर हल्ला करून दोनही मुलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी टोळीविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यानंतर भालकर व साथीदार फरारी झाले होते.

साथीदारासमवेत भाड्याच्या खोलीत वास्तव्य

चेनस्नॅचिंग गुन्ह्यात भालकरचा साथीदार शुभम तेलीला कागल पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले होते.चौकशीअंती काही गंभीर गुन्ह्यात भालकरचा सहभाग व तडीपार काळात आर. के. नगरातील भाड्याच्या बंगल्यात त्याचे वास्तव्य असल्याची माहिती पुढे आली.

गौरव भालकरसह तिघे जण खोलीत दडून बसले

प्रभारी अधिकारी शहाजी निकम यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक गजेंद्र लोहारसह डीबी पथकातील पोलिसांनी आर. के. नगरातील आर. एम. पाटील यांच्या बंगल्याला घेराव घातला. भालकर, त्याचे साथीदार नितीन लोखंडे व ओंकार इंदूलकर (25, गांधीनगर, करवीर)  हे खोलीत दडून बसल्याचे निष्पन्‍न झाले. लोहार यांनी शहाजी निकम यांच्याशी संपर्क साधून, त्यांना पाचारण केले. संशयित खोली बाहेर येत नसल्याने अखेर दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून पोलिस खोलीत घुसले. यावेळी तिघांनी जोरदार झटापट केली. भालकर, इंदूरकर हे पसार झाले. तर लोखंडे हाताला लागला. पोलिसांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले.

अधिकारी, पोलिसावर आरोप

काही तरुणांनी भालकरला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ‘करवीर’चे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, हवालदार संजय कोळी यांनी भालकरची चौकशी केली असता त्याने अधिकारी, पोलिसांनी बेदम मारहाण करून बळजबरीने फिनेलची बाटली तोंडाला लावल्याचा जबाब दिला.

आत्महत्येच्या प्रयत्नाचा बनाव : संजय मोहिते

कारवाईसाठी भालकरने झटापट करून स्वत:ची सुटका करून घेत पलायन केले. साथीदारांच्या मदतीने आत्महत्येच्या प्रयत्नाचा बनाव रचल्याचे निष्पन्‍न झाले आहे. पोलिसांशी झटापट करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल भालकरविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. भालकरचा फरारी सहकारी नितीन अर्जुन लोखंडे (24, सम्राटनगर) याला अटक करण्यात आली आहे. लोखंडे टोळीतील साथीदार आहे. त्याच्यावरही तडीपार  कारवाई करण्यात आली होती,  असेही ते म्हणाले.

चौकशीचा अहवाल वरिष्ठांना सादर होणार : दिलीप जाधव

संशयित भालकरने स्वत: फिनेल प्राशन केले की, त्याला कोणा अधिकारी, कर्मचार्‍याने बळजबरीने पाजले? याची चौकशी सुरू आहे. भालकरचा जबाब घेतला आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांशीही चर्चा केली आहे. दोन-तीन दिवसांत चौकशी पूर्ण होईल, त्यानंतर अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला जाईल. वरिष्ठांच्या अभिप्रायानंतर कारवाईबाबत निर्णय होईल, असे  करवीरचे निरीक्षक तथा तपासाधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.

टोळीविरुद्ध ‘मोका’ प्रस्ताव : निकम

आर. के. नगर, सम्राटनगरसह उपनगरामध्ये भालकर व त्याच्या साथीदारांनी कमालीची दहशत माजविली आहे. टोळीने कर्नाटकातही गंभीर कारनामे केले आहेत. खंडणीसाठी सामान्यांनाही धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. तडीपार काळातही उद्योग थांबलेले नाहीत. टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी म्होरक्यासह सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला आहे. कारवाईच्या धास्तीनेच संशयिताने आत्महत्येची पोलिसांना धमकी दिली होती, असेही निकम यांनी सांगितले.

रुग्णालयात प्रचंड बंदोबस्त

गौरव भालकर यास शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.