कोल्हापूर : प्रतिनिधी
मद्यधुंद अवस्थेत व्यावसायिकासह त्यांच्या पुत्राला धमकी देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्या एका युवा नेत्याची बेदम धुलाई केली. यावेळी झालेल्या झटापटीत त्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची चर्चा होती. निंबाळकर कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. ‘शाहूपुरी’चे निरीक्षक संजय मोरेंसह गुन्हे प्रगटीकरण पथकातील कर्मचार्यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. रिकाम्या पुंगळ्यांच्या शोधाचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच लागले नसल्याचे मोरे यांनी सांगितले. याची रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.
जिल्ह्यातील एका संस्थेचा संचालक असलेल्या युवा नेत्याचा रुईकर कॉलनीच्या पूर्वेला निंबाळकर कॉलनीत वावर असतो. गुरुवारी मध्यरात्री मित्रासमवेत युवा नेता मद्यधुंद अवस्थेत मोटारीतून आला. मोटार पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्याने शेजारच्या रहिवाशांना अपशब्द वापरले. आरडाओरड सुरू केल्याने कर्मचारी, परिसरातील रहिवासी गोळा झाले. त्यांनाही उद्देशून त्याने अपशब्द वापरले. आरडाओरडीने परिसरातील एका व्यावसायिकाचा मुलगा बाहेर आला. मुलासह त्याच्या वडिलांना उद्देशून त्याने एकेरी उल्लेख केल्याने जोरात वादावादी झाली. व्यावसायिकाच्या मुलाने दोन-तीन ठोसे लगावल्याने युवा नेता लोखंडी प्रवेशद्वारावर जोरात आदळला. झटापटीत गोळीबारसदृश मोठा आवाज झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. भीतीपोटी सर्वांनी आपापली
घरे बंद करून घेतली प्रतिबंधात्मक कारवाई करणार : मोरे
पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कॉलनीतील नागरिकांकडूनही माहिती घेतली. या कृत्याविरुद्ध अद्याप तरी कोणाची तक्रार नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. हवेत गोळीबार केला की काय, याचीही चौकशी होईल, असे ते म्हणाले.