Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Kolhapur › चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्‍ला

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्‍ला

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:44AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

नात्यातील तरुणाशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने डोक्यात दगड घातल्याने ज्योती सागर गोरे (वय 25, रा. बिद्री, भुदरगड) गंभीर जखमी झाली. पती सागर तिला कसबा बावड्यातील झूम प्रकल्पाच्या परिसरात घेऊन गेला व मारहाण केली. ज्योतीने आरडाओरडा केल्याने येथील महिलांनी तिला सागरच्या तावडीतून सोडवले. नागरिकांना पाहून सागर पसार झाला.

सागर आणि ज्योती हे सदर बाजार परिसरातील राहणारे आहेत. आठ वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी असल्याचे ज्योतीची आई रंजना थोडगे यांनी पोलिसांना सांगितले. सागर वेठबिगारी कामगार होता. दोघांनी सदर बाजार परिसरातील अनेकांकडून हातउसने पैसे घेतले होते. त्यांच्या या सवयींमुळे दोघे आर्थिक विवंचनेत होते. यामुळे दोन महिन्यांपासून ते बिद्री येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. 

दरम्यान, ज्योतीचे नात्यातील एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सागर गोरेला आला होता. गेले चार दिवस ज्योती आजारी असल्याने आई रंजनाकडे राहण्यास आली होती. रविवारी दुपारी सागर सदर बाजार येथे आला. ज्योतीला कामानिमित्त बाहेर घेऊन जातो, असे सांगून ज्योतीला कसबा बावड्यातील झूम प्रकल्पाच्या माळावर नेले. सागरने झूम प्रकल्प परिसरात बांबूने ज्योतीला मारहाण केली.

तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून या परिसरातील कचरा वेचणार्‍या महिला आणि काही स्थानिक धावत तिकडे गेले. लोक येताना पाहताच सागरने बाजूला पडलेला दगड उचलून ज्योतीच्या डोक्यात घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर त्याने पलायन केले. नागरिकांनी जखमी ज्योतीला उचलून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.