होमपेज › Kolhapur › आ. क्षीरसागरांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार : प्रा. कवाडे

आ. क्षीरसागरांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार : प्रा. कवाडे

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 12:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बहुजनांचा बालेकिल्‍ला असणार्‍या सिद्धार्थनगरात आ. राजेश क्षीरसागरांची घुसण्याची हिंमत होतेच कशी, पोलिसांनी त्यांना येऊ कसे दिले, अशी विचारणा करत या कृत्याबद्दल त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येत्या 28 फेबुवारीला मुंबईत निघणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद म्हणून मागील महिन्यात कोल्हापुरात दोन्ही समाज समोरासमोर येऊन दगडफेकीचे प्रकार घडले. याप्रकरणी सिद्धार्थनगरातील बुद्ध विहारमध्ये आयोजित मेळाव्यात प्रा. कवाडे बोलत होते. यावेळी डी. जी. भास्कर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

प्रा. कवाडे म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरण हे आरएसएसने घडवून आणले; पण आरोप इतरांवर करून मराठा व दलित समाजात तेढ निर्माण केले. मराठा समाजाने सकारात्मकच भूमिका घेतल्याने फार वणवा पेटला नाही; पण जे काही घडले ते चुकीचेच होते. कोल्हापुरात बहुजनांचा बालेकिल्‍ला असणार्‍या सिद्धार्थनगरात असाच तणाव निर्माण झाला. 

आम्ही शिवसेनेविरोधात नाही; पण शिवसेनेचेच आ. राजेश क्षीरसागर यांनी तणावात भर टाकली. त्यांच्या चिथावणीने तणाव वाढून समाजातील तरुण मुलांना मारहाण होऊन गुन्हे दाखल झाले. या मुलांना अजून जामीन मिळत नाही. म्हणूनच या सर्वाला कारणीभूत असलेल्या आ. क्षीरसागर यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी दाखल करावी, असा आग्रह पोलिसांकडे धरणार आहे. 

भीमा कोरेगाव  दंगल पूर्वनियोजित होती आणि आरएसएसच्या माध्यमातून संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या चिथावणीने त्यात भर पडली. त्यांच्यावर अजूनही कारवाई होत नाही. पंतप्रधान मोदी त्यांची पाठराखण करत आहेत, असा आरोपही कवाडे यांनी केला. आरएसएस ही जगभरातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे. सीमेवर दहशतवाद्यांचे, तर देशात आरएसएसचे हल्‍ले वाढले आहेत. गांधीजींचा खून करणारा गोडसे हा पहिला दहशतवादी असल्याचा पुनरुच्चारही प्रा. कवाडे यांनी केला. करकरे, साळसकर, कामटे यांच्या हत्येमागेही आरएसएसचाच हात असल्याचा आरोपही कवाडे यांनी केला. 

बंद सर्वांनी मिळून पुकारला असताना, बंद मागे घेतल्याची घोषणा एकट्या प्रकाश आंबेडकरांनीच कशी काय केली, हे अजूनही समाजाला उमगलेले नाही. बंदच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटायला आंबेडकर एकटेच कसे काय गेले, असा सवालही कवाडे यांनी केला.